Sobat Sakhichi : सोबत सखीची – स्त्रियांच्या आरोग्याचे महत्त्व!

The importance of women's health नामवंत स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ज्ञ डॉ. गौरी गणपत्ये यांची 'सोबत सखीची' ही लेख व व्हिडिओ मालिका

एमपीसी न्यूज – नामवंत स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ज्ञ डॉ. गौरी गणपत्ये यांची ‘सोबत सखीची’ ही लेख व व्हिडिओ मालिका आम्ही आपल्यासाठी सादर करीत आहोत. या माध्यमातून आपली सखी – डॉ. गौरी गणपत्ये या आपल्याशी दर आठवड्याला संवाद साधणार आहेत. स्त्रियांच्या आरोग्याचे महत्त्व, या विषयावरील या मालिकेतील हा पहिला भाग…


सोबत सखीची – भाग 1

स्त्रियांच्या आरोग्याचे महत्त्व!

आपल्या पैकी अनेकांना हा प्रश्न पडला असेल की स्त्रियांच्या आरोग्याला इतके महत्व का आहे?

सृष्टीचा जसा नियम आहे, उत्पत्ती, स्थिती आणि लय तसंच मानवी आयुष्याच्या तीन अवस्था आहेत, बाल्यावस्था, मध्यमावस्था आणि वार्धक्यावस्था

सध्याच्या काळात जन्मापासून साधारण सोळा वर्षांपर्यंत बाल्यावस्था, सोळा ते साठ वर्षापर्यंत मध्यमवस्था तर त्यांनतर वार्ध्यक्यावस्था असे वयाचे विभाजन करता येते. यातल्या 16 ते 35 या वयाला तारुण्यावस्था तर 35 ते 60 या वयाला प्रौढवस्था असं म्हणतात.

स्त्री आणि पुरुष दोघही या तिन्ही अवस्थेतून जातात. दोघांच्याही बाबतीत यातील बाल्यावस्था आणि वार्ध्यक्यावस्था साधारण सारखीच असते॰ म्हणजे त्यामध्ये होणारे बदल, शारीरिक व मानसिक आजार हे दोघांमध्ये साधारण सारखेच असतात.

मात्र स्त्री आणि पुरुष यांच्या आयुष्याची मध्यमावस्था मात्र वेगवेगळी असते. स्त्री आणि पुरुष यांचे शरीर काही अवयवांच्या दृष्टीने बाहेरून दिसायला सारखेच असते. उदा हात पाय नाक डोळे केस

इतकच नाही, तर शरीरातल्या पोकळीत असणारे लिव्हर, किडनी, हार्ट, ब्रेन यासारखे अवयव सुद्धा सारखेच असतात

आणि हे अवयव स्त्री आणि पुरुष या दोघांमध्येही सारखच काम करतात.

मात्र स्त्रीच्या शरीरात पुरुषापेक्षा एक अवयव जास्तीचा असतो आणि महत्वाचाही  असतो, तो म्हणजे गर्भाशय

या गर्भाशयामुळेच स्त्रीला मातृत्वची देणगी मिळाली आहे.

हे गर्भाशय जरी जन्मापासून स्त्रीच्या शरीरात असलं तरी त्याचं कार्य प्रत्यक्षात वयाच्या मध्यमावस्थेपुरतं मर्यादित असतं. अगदी स्पेसिफिक बोलायचं झालं तर गर्भाशयाचं प्रत्यक्ष कार्य तारुण्यावस्थेत सुरू होतं, प्रौढावस्थेत हळूहळू कमी होत जातं आणि वार्ध्यक्यावस्थेत ते पूर्णपणे बंद होऊन जातं.

म्हणूनच बाल्यावस्थेत आणि वार्धक्यावस्थेत स्त्रियांना गर्भधारणा होत नाही.

मासिक पाळीची सुरुवात, लग्न, प्रेग्नंसी, डिलिव्हरी, मुलांचं संगोपन आणि मासिक पाळी बंद होण्याचा काळ हे सर्व महत्वाचे टप्पे 13 ते 50 या वयोगटात येतात.

या प्रत्येक टप्प्याची आज आपण थोडक्यात ओळख करून घेऊया.

पहिला टप्पा आहे मासिक पाळी

स्त्रीचं गर्भाशय आपले कार्य व्यवस्थित करत असल्याची खूण म्हणजे तिची मासिक पाळीची सुरुवात होण. साधारण बारा तेराव्या वर्षी सुरू झालेली मासिक पाळी जसजसं गर्भाशय या अवयवाच कार्य कमी व्हायला लागत, तशी तशी बंद व्हायला लागते. एका स्त्रीची तिच्या आयुष्यात साधारणपणे 400 वेळा मासिक पाळी येते.

दुसरा टप्पा आहे लग्न

कुणी चेष्टेत म्हणेल की, लग्न काय फक्त स्त्रियांचाच होतं का पुरुषांचही होतचं की…

अगदी खरंय हे म्हणणं. पण लग्न होऊन सासरी पुरुष जात नाही, स्त्री जाते. त्यामुळे एका पूर्ण नवीन कुटुंबात कायमचं रहायला जाणं, त्यांच्यातल्या प्रत्येक सदस्याशी जुळवून घेणं याचा प्रत्यक्ष संबंध स्त्रीचा येतो. बायको सोबतच सून, काकू,मामीअशी अनेक नाती एकाच वेळी सांभाळायला लागतात. कधी कधी यामध्ये बराचसा मानसिक ताणतणाव निर्माण होतो.आणि असा मानसिक तणाव जिथे जिथे जास्त प्रमाणात होतो, तिथे तिथे हार्मोनल imbalance जास्त प्रमाणात होतो.म्हणूनच स्त्रियांमध्ये हार्मोनल disorders जास्त प्रमाणात बघायला मिळतात.

तिसरा टप्पा आहे डिलिव्हरी

पुन्हा तेच… मुलं काय फक्त स्त्रियांनाच होतात का ? पुरुषाचाही त्यात सहभाग असतोच की.

मूल होण्यामध्ये पुरुषाचा सहभाग असला तरी प्रत्यक्ष गर्भधारणेची क्रिया स्त्रीच्या शरीरात होत असते. हा काळ थोडाथोडका नाही, नऊ महिन्यापर्यंत असते. आणि यातल्या गर्भावस्थेच्या प्रत्येक एकेक दिवशी त्या गर्भावस्थेचे तिच्या शरीरावर आणि मनावर देखील परिणाम होत असतात. आणि तिच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचे परिणाम गर्भावर परिणाम होत असतात.

गर्भावस्थेत झालेले काही बदल डिलिव्हरी झाल्यानंतर हळूहळू दिसेनासे होतात तर काही बदल शरीरावर कायम स्वरूपी रहातात. गर्भावस्थेमुळे निर्माण झालेले काही आजार पुढे आयुष्यभर सोबत करतात.

डिलिव्हरी हा स्त्रियांच्या आयुष्यातला एक मोठा अनुभव. पूर्वीच्या काळी जेव्हा मेडीकल फसिलीती आताच्या इतक्या प्रगत नव्हत्या, तेव्हा तर बाळंतपणात अनेक स्त्रियांचा मृत्यू व्हायचा. सुदैवाने ते प्रमाण आता खूप कमी झालं असलं तरी एकंदर डिलिव्हरीच्या प्रक्रियेला स्त्रीला एकटीलाच सामोर जाव लागतं.

चौथा टप्पा आहे मुलांचे संगोपन

पहिल्या सहा महिन्यात मूल पूर्णत: आईच्या दुधावर अवलंबून असते. मुलांच्या संगोपनात active पार्ट हा स्त्रीचाच अर्थात आईचाच असतो.

पाचवा टप्पा आहे मासिक पाळी बंद होण्याचा काळ –

मुलं मोठी होऊन शिक्षण आणि नोकरी निमित्त घराबाहेर पडायला सुरुवात होते, त्या काळात स्त्री मासिक पाळी बंद होण्याच्या फेजमध्ये पोचलेली असते. त्यालाच मेनोपॉज असं म्हणतात. ही अवस्था शारीरिक आणि मानसिक स्तरावर एकटीने पेलणं स्त्रीला खूप कठीण असतं कारण रोज उठून काही न काही आरोग्याच्या तक्रारी सुरू असतात, होरमोनल imbalance मुळे मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं असतं. छोट्या छोट्या गोष्टीवर राग येतो, रडू येतं, विनाकारण चिडचिड वाढते. खरं तर ही सगळी मेनोपॉजची लक्षणे असतात आणि ती अवस्था क्रॉस केल्यानंतर ही लक्षणे कमीही होणार असतात, पण त्या काळात घरातल्या सर्वांनी तिला समजून घेणं फार गरजेचं असतं.

आताच्या काळात स्त्रीला तिच्या वयानुरूप येणार्‍या सर्व अवस्था सांभाळून शिक्षण, नोकरी आणि करियर यामध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं असतं. त्यासंबंधीचे ताणताणाव हा तर वेगळाच विषय आहे.

म्हणूनच स्त्री जर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असेल तर ती या सर्व टप्प्यांमधून यशस्वीरित्या पुढे पुढे जात रहाते. कारण मुळात आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार ? तिचं शरीर आणि मन हेल्दी नसेल तर ती या सगळ्या अवस्था निभावणार कशी?  एक स्त्री घरातील मुलं, नवरा, आणि आजी-आजोबा अशा तीन पिढ्यांना एकाचवेळी आपल्या परीने उत्तमरित्या communicate करणारी कुटुंबाचा मध्यबिंदू असते. आणि म्हणूनच तिचं स्वास्थ्य नुसतं शारीरिक स्वास्थ्य नाही, मानसिक स्वास्थ्य सुद्धा सांभाळण्याची जबाबदारी कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याची आहे. आपल्याला माहिती आहे शरीर ताठ उभं रहाण्यासाठी, शरीराचा तोल सांभाळण्यासाठी कोणता भाग महत्वाचा आहे? तर पाठीचा कणा. स्त्री म्हणजे कुटुंबरूपी शरीराचा तोल सांभाळणारा पाठीचा कणा आहे…. पटतंय ना तुम्हाला देखील?

मला वाटतं या लेखातून आणि सोबतच्या व्हिडिओमधून स्त्रियांचं आरोग्य महत्वाचं का आहे, हे आपल्या लक्षात आलं असेल. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, ते नक्की लिहा. आवडला तर जरूर like आणि share करा. मी दर आठवड्याला स्त्रियांच्या आरोग्यासंबंधी नवीन व्हिडियो घेऊन येत आहे, तुम्हाला ते पहायचे असतील तर चनेलला साबस्क्राईब जरूर करा. पुढच्या आठवड्यात नवीन माहितीसोबत नक्की भेटू तोपर्यंत, धन्यवाद!

– डॉ. गौरी गणपत्ये

M.S ( Ayu ) OBGY
P.G.D.Diet

स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ञ

मोबाईल – 9423511070  ई-मेल [email protected]

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.