Blog: वैद्यकीय क्षेत्राची ढासळत चाललेली विश्वासार्हता

Blog By Dr. Tanaji Bangar: The declining credibility of the medical field कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळ्या आणि घंटानादचा उपक्रम हा डॉक्टर मंडळींना प्रोत्साहन देण्यासाठीच केला होता.

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या महामारीमुळे जगभरात कहर माजलेला आहे. परंतु, फक्त ‘सेवा परम धर्म’ या उक्तीप्रमाणे असंख्य डॉक्टर मंडळी आपल्या प्राणाची बाजी लावून अहोरात्र रुग्णसेवा करताना दिसत आहेत. काही खासगी रुग्णालयांनी मात्र या परिस्थितीतही बाजार मांडलेला दिसतोय.

रोजचे मृत्यूचे आकडे ऐकून रुग्णांचे मनोबल आधीच ढासळत आहे. टेस्ट पॉझिटिव्ह आली की काही रुग्ण लक्षणे नसताना देखील मोठ्या कॉर्पोरेट रुग्णालयात जाऊन दाखल होत आहेत.

जिकडे पाहाल तिकडे रुग्णालयातील बेड कोरोना रुग्णांसाठी फुल्ल झालेले दिसत आहेत. काही खासगी रुग्णालये ‘अधिग्रहण कायदा’ याची अंमलबजावणी झालेला असताना देखील जागा शिल्लक असून रुग्णांना उपचारासाठी दाखल करुन घेत नाहीत.

तापाच्या रुग्णांना बाहेरून तपासणी न करता त्यांना सरकारी रुग्णालयात पाठवले जात आहे. माणुसकी कुठे शिल्लकच राहिली नाही का? माणूस माणसाला संशयी नजरेने का बघू लागलाय?

कोरोनाने आपल्यामध्ये एवढे विष कधी कालवले याचा अंदाज आला नाही. आवश्यक सर्व ती काळजी घेऊन डॉक्टरांनी रुग्ण तपासणी करणे, रुग्णाला मानसिक आधार देऊन बरे करण्याला हातभार लावणार नाही का?

कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळ्या आणि घंटानादचा उपक्रम हा डॉक्टर मंडळींना प्रोत्साहन देण्यासाठीच केला होता. कारण ही डॉक्टर मंडळी या महामारी काळात योद्धे होऊन लोकांचे रक्षण करतील.

आरोग्याचे युद्ध जिंकण्यासाठी आणि कोरोना या आजाराचा पराभव करण्याच्या उद्देशाने आपण रणांगणात उतरलो होतो. सारा देश डॉक्टरांप्रती मोठ्या आशेने विसंबून आहे.

त्यामुळे या अडचणींवर मात करून आपण लोकांचे मनोबल उंचावणे आणि त्यांना उपचार करून आधार देणे खूप महत्त्वाचे आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे अगोदरच आर्थिक विवंचना, व्यापार नुकसान आणि कौटुंबिक कलहामुळे त्रस्त आहे.

बऱ्याचदा या नैराश्यमुळे पूर्ण कुटुंबाने आत्महत्या केलेल्या आपण बघतोय. हे कमी करण्यात डॉक्टर म्हणून आपला खूप मोठा सहभाग आवश्यक असणार आहे. जगात भारताच्या आरोग्यव्यवस्थकडे सन्मानाने पाहिले जात आहे. त्याचा प्रत्यय आपण या काळात दिला पाहिजे.

खासगी रुग्णालयाने या अडचणीच्या काळात लोकांकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारणी करून आर्थिक पिळवणूक करणे थांबवले पाहिजे. कोरोनामुळे रुग्णालयीन खर्चात थोडीशी वाढ झाली असेल. पण त्याचा अर्थ दुप्पट किंवा तिप्पट बिल वसूल करणे असा नाही.

भेदरलेल्या रुग्णाची ससेहोलपट इथेच थांबत नाही. रुग्णाचे काय होईल, यापेक्षा बिल किती येईल आणि ते कसे भरायचे यात तो पुरता भरडला जात आहे.

त्यामुळे हॉस्पिटलला उद्योगपतींनी सुरू केल्यासारखे धंद्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यात डॉक्टर मात्र फक्त बिलाच्या जेमतेम दहा टक्के प्रोफेशनल फी घेऊन बदनाम होतो आहे.

रुग्णालय व्यवस्थापनाने या अडचणीत माणुसकीचा विचार करून बिल आकारणी करावी हीच माफक अपेक्षा. सर्वांत प्रथम आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, हा पवित्र व्यवसाय आहे आणि इतरांसारखा धंदा नाही.

त्याचे पावित्र्य आणि विश्वासार्हता राखणे हे सर्वांचे कर्तव्य असले पाहिजे. तुम्ही तुमची फी नक्की घ्या. पण या अडचणीच्या काळात ही फी हिशेबाने घ्यावी हीच रुग्णाची माफक अपेक्षा असणार आहे.

कारण या काळात अडवणूक करून बिझनेस करणे कोणत्या नितीमत्तेला धरून आहे? कोरोना आज आहे. उद्या नसेल. पण आपण सर्व असू हे नक्की.

आपण या संकटकाळात केलेली नैतिकता आणि माणुसकीचे दर्शन हा समाज नक्की विसरणार नाही. तेव्हा हीच वेळ आहे जिथे संधीसाधू न बनता लोकाना तत्पर वैद्यकीय सेवा देऊन त्यांचे आशीर्वाद घेण्याची.

आधीच वैद्यकीय क्षेत्राची विश्वासर्हता ढासळत चालली आहे. त्याला लोकांच्या अवास्तव अपेक्षा हे पण एक कारण असेल. पण रुग्णांशी संवाद वाढवून उपचारबद्दलची माहिती त्यांना त्यांच्या भाषेत समजून सांगणे, गैरसमज टाळण्यासाठी तेवढेच आवश्यक आहे. नाहीतर येणार्‍या पिढ्या या महामारीच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या बिझनेस आणि आर्थिक अडवणुकीला कधीच माफ करणार नाहीत.

लेखक- डॉ. तानाजी बांगर
चिंचवड, पुणे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.