Blog by Govind Gholve: राजकारण आणि टीआरपीचा कोरोना घेतोय जनतेच्या मूलभूत प्रश्नांचा बळी

सुशांत सिंह प्रकरण सोडता देशापुढे सध्या कोणताच प्रश्न नाही, असं चित्र माध्यमांतून उभं केलं जात आहे. माजी पोलीस महासंचालक देखील म्हणतात, हा सगळा राजकीय अजेंडा असून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा केंद्र सरकारचा एक प्रकारे डाव आहे. अशा राजकारणामुळे महाराष्ट्राची आर्थिक घडी मोठ्या प्रमाणात विस्कळीत करणार असून सर्वसामान्यांच्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देखील केवळ विरोधी पक्षाचे सरकार आहे म्हणून त्यांना असहकार्य करणे, हे लोकशाहीविरोधी काम आहे….. वाचा जर्नालिस्ट ऑल इंडिया असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गोविंद घोळवे यांचे राज्यातील सद्यस्थितीवरील परखड भाष्य!
——————————————————————

राजकारण आणि टीआरपीचा कोरोना घेतोय जनतेच्या मूलभूत प्रश्नांचा बळी

लेखक – गोविंद घोळवे 

 कोरोना महामारीने सबंध भारतात हाहाकार उडाला असून भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. कोट्यावधी लोकांची नोकरी गेली तर व्यापारी, हॉटेल व्यवसायिक, कारखानदार रस्त्यावर आले असताना अनेक पक्ष वरील संकटाचा मुकाबला करण्यासाठी एकत्र येण्यापेक्षा दररोज राजकारण करीत आहेत, हे वागणे बरे नव्हे किंवा ‘कारभारी जरा दमानं घ्या’ असे सर्वसामान्य नागरिक म्हणत आहेत.

 मार्च महिन्यापासून भारतात नव्हे तर सबंध जगभरात अर्थचक्र थांबले असून सर्व क्षेत्रे ठप्प झाली आहेत. जगातील 600 कोटींपेक्षा अधिक लोक आणि भारतातील 130 कोटी जनता जीव मुठीत धरून बसली आहे. अशावेळी कधी सुशांत सिंह राजपूत तर कधी मंदिर- मशीद उघडा म्हणून आंदोलन, मोर्चे, आरोप-प्रत्यारोप दररोज सुरू आहेत. यावेळी मात्र विरोधी पक्षांकडून सोशल डिस्टन्सिंगची ऐसी की तैसी झाली आहे आहे त्यामुळे संकट कमी होण्यापेक्षा जीवघेण्या आजाराला आमंत्रण देण्याचा हा प्रकार आहे. 

 छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात ज्या पद्धतीने सध्या वातावरण निर्माण झाले आहे ते लांच्छनास्पद आहे. ‘मुख्यमंत्री हटाव, महाराष्ट्र बचाव’ किंवा ‘दार उघड, आता दार उघड उद्धवा’, असे आंदोलन सुरू आहे, परंतु राज्यात आणि देशात दररोज हजारो माणसे मृत्युमुखी पडतात याकडे कोणाचे लक्ष नाही ही बाब महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी आहे.

मंदिर, मशीदच काय, सर्वच व्यवसाय उघडे झाले पाहिजेत. गोरगरीबांना रोजगार मिळवून  ‘सर्वे भवन्तु सुखिनः’  जीवन जगले पाहिजेत परंतु आंदोलन करताना सध्या महाराष्ट्रात कोणाची परिस्थिती सर्वाधिक गंभीर आहे, याचे भान विरोधी पक्षाला का नाही याबाबत आश्चर्य वाटते. हे आंदोलन, मोर्चा काढणे हा विरोधी पक्षाचा नव्हे तर भारतीय लोकशाहीत प्रत्येकाचा अधिकार आहे, मात्र आंदोलनामुळे दहा जणांच्या कल्याणासाठी 80 जणांना वेठीस धरणे योग्य नव्हे.

कोरोना देव-धर्म- श्रीमंत नागरिक कोणालाच घाबरत नाही. व्यवस्थित वागले नाही तर तो कोणतेही सावज टिपतो याकडे विरोधकांनी दुर्लक्ष करून चालणार नाही. आज भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे. भारताचा जीडीपी 23.5 टक्के घसरला असून जगात भारत सर्वाधिक आर्थिक संकटात सापडला आहे. कोट्यवधी लोकांचे रोजगार नोकरी गेली असून हॉटेल, पर्यटन, व्यापार, कारखानदार, ट्रान्सपोर्ट आणि सेवा देणारे व्यवसाय ठप्प झाले आहे. जवळपास 40 ते 50 टक्के व्यवसाय कमी झाला असून 40 टक्के नोकरकपात केली आहे. पगारवाढ हा विषय संपुष्टात आला आहे सर्वाधिक फटका हॉटेल पर्यटन विभागाला बसला असल्यामुळे महाराष्ट्राचे हजारो कोटी रुपये पाण्यात गेले आहेत.

अशावेळी जिओ आणि जीने दो या म्हणीप्रमाणे सर्वपक्षीय नेते मंडळींनी काम करण्यापेक्षा मंदिर-मशीद, सुशांत सिंह, आंदोलनाकडे अथवा आरोप-प्रत्यारोपांकडे केवळ राजकीय विषय म्हणून पाहू नये, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सध्या 80 टक्के जनता वेदना आणि विवंचनेत जगत असून प्रत्येकाला स्वतःची उपजीविका कशी भागेल, हे महत्त्वाचे वाटत आहे. व्यापार-उद्योगांना आपले कारखाने कसे चालणार सरकार आपणास काय मदत करणार ही चिंता आहे त्यामुळे विरोधकांनी आता प्रथम प्राधान्य अर्थचक्र कसे रूळावर येईल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

सर्व भारतीय माणसाचा केंद्रबिंदू असणारी बँक व्यवस्था सध्या ज्यांच्याकडे कर्ज आहेत त्यांना पुन्हा कर्ज देत असून ज्यांनी कर्ज घेतले नाही. अशांना नवीन कर्ज देत नाही. त्यामुळे लाखो व्यावसायिकांचे भविष्य संकटात सापडले आहे तसेच मोठ्या प्रमाणात एनपीएमध्ये सापडल्या आहेत. याबाबत विरोधी पक्षाने दिल्ली सरकार विरोधी मोर्चा काढावा, घंटानाद आंदोलन करावे, हे जेणेकरून लाखो लोकांना व्यवसाय करण्यास अडचण येणार नाही ही भारतात सध्या सर्व क्षेत्रात हाहाकार उठला असून चीन देखील डोकलाम टॅंगो मध्ये दररोज सैनिक पाठवून आपल्याबरोबर कबड्डी खेळत आहेत, हे संकट कमी होण्यापेक्षा दररोज वाढत आहे.

अशा वेळी भारतीय माध्यमे देखील दररोज सुशांत सिंह प्रकरण लावून धरत आहेत. जणू काही या देशातील सर्व प्रश्न मार्गी लागले आहे अथवा सुशांत सिंह प्रकरण सोडता देशापुढे सध्या कोणताच प्रश्न नाही. माजी पोलीस महासंचालक देखील म्हणतात, हा सगळा राजकीय अजेंडा असून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा केंद्र सरकारचा एक प्रकारे डाव आहे. अशा राजकारणामुळे महाराष्ट्राची आर्थिक घडी मोठ्या प्रमाणात विस्कळीत करणार असून सर्वसामान्यांच्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देखील केवळ विरोधी पक्षाचे सरकार आहे म्हणून त्यांना असहकार्य करणे, हे लोकशाहीविरोधी काम आहे.

हे राज्यातील आणि देशातील जनता सध्या प्रचंड अडचणीत असून सर्वसामान्य नागरिकांना रोजगार, व्यापार आणि स्वतःचे आयुष्य महत्वाचे वाटत असून कोरोना महामारीतून कधी बाहेर पडू, ही चिंता सर्वांना पडली आहे. अशावेळी केवळ आरोप-प्रत्यारोप करून राजकीय अजेंडा पुढे करणं महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांना तिलांजली देण्यासारखा प्रकार आहे.

त्यामुळे विरोधी पक्षांनी केवळ विरोधाला विरोध म्हणून घंटानाद आंदोलनाचे राजकारण प्रकरण लावून धरणे अयोग्य आहे. कारण भारतात आणि राज्यांमध्ये वरील प्रकरणात पेक्षा कोट्यावधी लोकांचे जीव आणि त्यांची उपजीविका महत्त्वाची आहे. अशा वेळी केवळ राजकारण करणे म्हणजे हे सर्वसामान्य माणसाला कळत नाही, असे समजणे हा दूधखुळेपणा आहे.

सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळालाच पाहिजे त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशी नियुक्ती केली असून तसा तपास देखील सीबीआयने सुरू केलेला आहे हे परंतु दररोज माध्यमात याच बातम्या येत असतील तर एकच म्हणावे लागेल भाजपाच्या भाषेत ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ भारतात लोकशाही जिवंत आहेत त्यांची प्रथम काळजी घेणे हे प्रत्येक सरकारचे आणि विरोधी पक्षाचे कर्त्यव्य असते, परंतु सध्या भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून शिवसेनेने दूर ठेवले असल्यामुळे त्यांना धनाजी-संताजी यांच्या घोड्याप्रमाणे केवळ सेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसत आहेत, ही बाब अत्यंत दुर्देवी असून महाराष्ट्राच्या राजकारणाला काळीमा फासणारी आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही

आतातरी लोकांना कोणत्याही पक्षाच्या राजकारणात रुची नसून प्रत्येकाला केवळ ‘जिओ और जीने दो’ हे महत्त्वाचे वाटत आहे. महाराष्ट्रातील आघाडी सरकारने देखील विरोधी पक्षाला आंदोलने, मोर्चा काढण्यासाठी संधी मिळेपर्यंत ताणू नये. जे काही नियम असतील त्याप्रमाणे सर्व ठिकाणी अनलॉक मार्ग अवलंबावा. त्यामुळे किमान घंटानाद आंदोलन तरी थांबेल आणि गोरगरीब जनतेची उपजीविका सुरू राहील.

कठोर निर्णय कठोर घ्या, परंतु आता सर्वांना न्याय देऊन अनलॉककडे जोरदार वाटचाल करणे गरजेचे आहे, हे वेळ प्रसंगी जाहीर करा की, तुमच्या जबाबदारीवर उघडा मात्र काही नुकसान झाले तर पुन्हा भाजपसारखा घंटानाद करू नका, असे ठणकावून देखील जनतेला सांगण्याची गरज आहे.

शेवटी कोरोना जनतेला दररोज आठवण करून देतो, ‘बाबांनो, व्यवस्थित वागला नाही तर जगी सर्व सुखी असा कोण आहे, या रामदास स्वामी यांच्या अभंगाप्रमाणे त्यामुळे जनतेने देखील स्वतःचे जीवन महत्त्वाचे समजून कोरोनापासून सुरक्षित राहावे एवढीच अपेक्षा!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.