एमपीसी न्यूज-  पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाने उच्छाद मांडला आहे. या संकटाचे संधीत रुपांतर करणाऱ्यांनी दुकानदारी चालू केली आहे. हे सर्व थांबवून ही दोन्ही शहरे कोरोनामुक्त होण्यासाठी सर्वांनी मिळून एकाच ध्यासाने काम करण्याची आवश्यकता आहे…. वाचा ज्येष्ठ पत्रकार गोविंद घोळवे यांचा परखड भाष्य करणारा विशेष लेख!

—————————————————–

एकच ध्यास… करुयात पुणे, पिंपरी-चिंचवडमधून कोरोनाचा विनाश!

लेखक – गोविंद घोळवे

संत ज्ञानेश्वर महाराज, जगदगुरु संत तुकाराम महाराज, महासाधू मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पिंपरी-चिंचवड शहरात सध्या कोरोनाने विळखा घातला आहे. शासक, प्रशासन आणि जनताजनार्दनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. आभाळ फाटल्यानंतर हाहाकार होतो, तशीच परिस्थिती सध्या शहरामध्ये निर्माण झाली आहे. एखादी सुनामी येते किंवा भूंकप होतो. अशावेळी सगळीकडे नैराश्य, भीती आणि अशांत परिस्थिती निर्माण होते. तशीच परिस्थिती सध्या कोरोनामुळे निर्माण झाली असून प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने दुकानदारी चालवीत आहे.

जीवघेण्या आजारामध्ये देखील बाजार सुरु आहे. प्रत्येक अधिकारी, डॉक्टर, आपआपल्या परीने हात धुवून घेत आहेत. त्यामुळे कोरोना काय आजार आहे, हे अद्याप कोणाला अवगत नाही. केवळ डॉक्टर सांगतात म्हणून नंदीबैलासारखी जीव मुठीत घेऊन मान हलविण्याशिवाय रुग्णांच्या हातात काहीही नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत सारे प्रशासन हलविले आणि कोरोना आटोक्यात आणला. परंतु, पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना आटोक्यात येण्याऐवजी दररोज वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंत भीती, नैराश्य आणि न्यूनगंड निर्माण झाला आहे. प्रत्येकजण जीव मुठीत घेवून आपला व्यावसाय, नोकरी सांभाळत आहे. परंतु, हे किती महिने चालणार याबाबत सध्यातरी शासन, प्रशासक ठामपणे सांगू शकत नसल्यामुळे ‘राम भरोसे’ म्हणत जनजीवन थोड्या प्रमाणात सुरु आहे.

मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मिरा भाईंदर या पालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. तर, नवी मुंबई पालिकेवर प्रशासक आहे. तर, काही ठिकाणी भाजपची सत्ता असली तरी मुंबई, ठाणे, नवी मुंबई या पालिकेची आर्थिक मदत फार मोठ्या प्रमाणावर नागरिकांना होत आहे.

मंत्रालय आणि सारे शासन महाविकास आघाडीचे असल्याने वरील ठिकाणी कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात सरकारला यश आले आहे. मात्र, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील दोनही पालिकेवर भाजपची सत्ता असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही अडचणी संदर्भात बोलून मार्ग काढला पाहिजे.

सध्या कोणत्याही नागरिकांना राजकारणापेक्षा अर्थकारण महत्वाचे असल्याने प्रत्येकाला ‘हेल्थ इज वेल्थ’ महत्वाची वाटत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी वरील शहरातील गोरगरीब जनता कशी वाचेल. याबाबत गांभीर्याने काम करणे गरजेचे आहे. आरोप-प्रत्यारोप करण्याची ही योग्यवेळ नव्हे. ‘एकच ध्यास पुणे, पिंपरीतील कोरोनाचा विनाश’ असे मिशन राबविण्याची गरज आहे. तरच मृत्यूदर कमी होईल. अन्यथा गोरगरिबांचे संसार उघड्यावर पडतील.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आता ‘हार्डवर्क’ दाखविण्याची गरज

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आता ‘हार्डवर्क’ दाखविण्याची गरज आहे. केवळ ऑगस्ट अखेर शहरात 50 हजार रुग्ण असतील असे जाहीर करणे म्हणजे लोकांना धीर देण्यापेक्षा घाबरविण्याचा जास्त प्रकार आहे. यामुळे आयुक्तांनी सध्या प्रशासनावर प्रचंड अंकुश ठेवून टक्केवारी, वाटमारी आणि हेराफेरी करणा-यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.

मुळात कोरोना टेस्ट संदर्भात देखील दररोज ऐकण्यात येते पॉझिटीव्ह, निगेटीव्ह हा प्रकार देखील ‘मॅच फिक्सिंग’ सारखा आहे. कोरोनावर औषोधोपचार नाही. तर, ब्लॅकने इंजेक्शन गोळ्या कशा विकल्या जातात. खासगी दवाखाने तर खाटीकखान्यासारखे पैसे कमविण्याच्या मागे लागले आहेत. आज सगळीकडे काळा बाजार सुरु आहे.

केवळ पैसे उकळण्याचा धंदा जोरात सुरु आहे. ज्याच्याकडे पैसे नाहीत. अशा व्यक्तीला ‘राम भरोसे’ सोडले जाते. हे चित्र माणुसकीला काळीमा फासणारे आहे. रक्षकच जर भक्षक होत असतील. तर, सगळीकडे रोगाचा प्रलय आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे खासगी हॉस्पिटलचालकांनी आता पैसे कमविण्यापेक्षा माणुसकी कमविण्याची गरज आहे.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पिंपरी शहराकडे जास्त लक्ष देवून येथील भीतीदायक वातावरण कमी करण्यासाठी सारी शासकीय यंत्रणा कामाला लावणे गरजेचे आहे. वेळप्रसंगी आणखी दोन आयएएस अधिकारी नियुक्त करा आणि उद्योनगरीला वाचवा. कारण, हे शहर महाराष्ट्र आणि देशाच्या आर्थिक प्रगतीत फार मोठा हातभार लावत आहे.

ग्लोज, मास्क, गोळ्या, मशीन, व्हेंटिलेटर बेड, जेवण अन्य साहित्य पुरविणाऱ्या ठेकेदारांकडून दोन रुपयांची वस्तू 20 रुपयांना खरेदी करणे. त्यामध्ये टक्केवारीसाठी आरोप-प्रत्यारोप ही बाब फार गंभीर असून यासंदर्भात शहरातील खासदार, आमदारांनी लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या टिका-टिप्पणी करण्याची वेळ नाही.

त्यामुळे प्रत्येकाने पक्ष, धर्म, जात यापलिकडे जाऊन माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे. हीच ईश्वर सेवा आणि समाजसेवा आहे. अन्यथा ‘ये पब्लिक है सब जानती है’, एवढेच येथे सांगावे वाटते. त्यामुळे सध्या तरी एकच ध्यास पुणे, पिंपरीत कोरोनाचा विनाश ही मोहीम सर्व राजकीय पक्ष आणि डॉक्टर मंडळींनी राबवावी.

(लेखक गोविंद घोळवे हे ज्येष्ठ पत्रकार तथा शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य संघटक आहेत.)