Blog by Harshal Alpe : उडता बॉलीवूड!

एमपीसी न्यूज (हर्षल आल्पे) – सध्या एकामागून एक वेगवेगळ्या बातम्या येत असतात. नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार सुप्रसिद्ध अभिनेता सुपरस्टार बादशहा शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला उत्तेजक द्रव्य सेवनाच्या प्रकरणात अटक झाली. ही कारवाई एनसीबीने केल्याचे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. पण गंमत अशी की मागील वर्षी सुद्धा या उत्तेजक द्रव्य सेवनाच्या प्रकरणासंदर्भात खूप खोलवर चर्चा झाली होती, नाही का?

या प्रकरणात मोठ्या नामांकित कलाकारांची नावे सुद्धा चर्चिली गेली. काहींना एनसीबीने चौकशीसाठी बोलवले. मात्र त्यातून कुणाला मोठी शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही. निदान मोठ्या कलाकारांपैकी तरी नाही, म्हणायला माध्यमांवर त्यांचे व्हाट्सअप वरील संभाषण मात्र चांगलेच व्हायरल झाले होते. कायद्याचा धाक हा सगळ्यांनाच असला पाहिजे. सर्वसामान्य माणूस यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशीच मागणी करतोय मात्र तरीसुद्धा एक भीती सातत्याने बोलून दाखवली जाते की इथे पैसा असला की कशातूनही सहीसलामत सुटता येतं.

अशा पद्धतीची प्रतिमा तयार होणे हे निश्चितच चांगले नाही. सामान्य माणसाला विश्वास बसेल अशा गोष्टी घडल्याच पाहिजेत. समाजात दोन भाग कधीच पडता कामा नयेत पण आजकालच्या जमान्यात हा आदर्शवाद झाला आणि आदर्शवादाला लक्षात कोण घेतो? हा एक मोठा प्रश्नच आहे.

आता या प्रकरणात सुद्धा राजकारणाची फोडणी दिली जाणार. जे सध्याच्या माध्यमांच्या बातम्यांमधून दिसतच आहे. यामध्ये आर्यन खान सारख्या नव्या पिढीच्या तरुणाईला काहीतरी वचक बसावा असे मनोमन वाटते पण आमच्याकडे प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधण्याची जी प्रवृत्ती बळावत चालली आहे ती घातक आहे. त्याची दाहकता ही त्या उत्तेजक द्रव्ये यांच्या सेवना इतकीच विघातक आहे.

आर्यनचे प्रकरण बाहेर आल्यावर त्या क्रूजची तपासणी का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित झाला. काहींनी त्यात तीन हजार टन ड्रग्ज सापडलेल्या गुजरात मधील तथाकथित बातमीकडे लक्ष वेधले. समाज माध्यमांवर थोडीशी नजर फिरवल्यावर तेच आकडे 21 हजार टन इतके झाले. आणि यातून एक प्रश्न निर्माण झाला की हे इतके अमली पदार्थ आले कुठून?

आर्यन आणि त्याच्या सहकाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे जर ते दोषी असतील तर, पण मूळ प्रश्न हा यापेक्षा खूप मोठा आहे गोव्याच्या त्या क्रूज वर ते अमलीपदार्थ हवेतून येणे शक्यच नाही. स्थानिक कुणी तिथे आणल्याशिवाय तिथे असे ते सहज उपलब्ध होणार नाहीत. गुजरात मधली ही बातमी अफवा असू शकते पण काहीतरी घडल्याशिवाय कुणी बातमी अशी देऊ शकत नाही, आकडे पुढे-मागे होऊ शकतात पण कोणीतरी कधीतरी हा खुलासा करणार आहे का की खरंच गुजरातमध्ये अमली पदार्थ सापडले होते?

बाकी ते जाऊ द्या, तो एक वेगळाच ब्रेकिंग न्यूज चा विषय ठरेल! सहज इंटरनेट चेक करत असताना एक वेगळाच पैलू या सगळ्यातला लक्षात आला ते म्हणजे बॉलीवूड मधील आज बहुतांश कलाकार हे फिटनेस कॉन्शस आहेत. सगळे जीम मध्ये आपला बहुतांश वेळ घालवतात असे साधारण निरीक्षण आहे. आपण बाकी अमली पदार्थांवर कारवाई करू पण या जिम मधल्या अमली पदार्थांचे काय ज्याचे परिणाम तुम्ही इंटरनेटवरही पाहू शकता, तपासू शकता जिम मध्ये जी औषधे एक्स्ट्रा फिटनेस साठी दिली जातात ती एकदा नीट तपासण्याची गरज आहे.

एएमपी सारख्या पदार्थांचे अतिरिक्त दुष्परिणाम हे पदार्थ सेवन करण्याचे सोडल्यावर आपल्या शरीरावर त्याचा विघातक परिणाम होतो काहींना त्यामुळे डिप्रेशन येते तर काहींच्या हृदयावर त्याचे वाईट परिणाम होतात. काही तरुणांच्या होणाऱ्या आत्महत्या याच्यामागे ही हीच ड्रग्स आहेत असे तज्ञ सांगतात. कुठल्याही गोष्टीचे एडिक्शन होणे हे हे वाईटच!

मागील वर्षी सुशांत सिंग राजपूत या मोठ्या अभिनेत्याच्या संशयास्पद मृत्यूमुळे अनेक तज्ज्ञांनी आपली मतं मांडली त्या बहुतांश मतांमध्ये हाच मुद्दा आला होता पण त्यावेळेच्या गदारोळात हा मुद्दा विरून गेला. खाजगीमध्ये अनेक अभिनेते-अभिनेत्री आपण डिप्रेशन मध्ये होतो हे मान्य करतात पण ते डिप्रेशन का आले होते? हे कोणीच सांगत नाही.

आपल्या भारत देशामध्ये अमली पदार्थांवर बंदी तर आहेच त्याचे काटेकोरपणे पालन व्हायला पाहिजे पण या जीम मधल्या ड्रग्जवर ही संबंधित  नार्कोटिक्स डिपार्टमेंटची करडी नजर असली पाहिजे. या निमित्ताने एवढेच वाटते की या तरुणाई पुढे त्यातल्या काहींचे असलेले आणि होणारे आदर्श हे या विळख्यात असतील सुद्धा, पण आजच्या तरुणाईनेच नव्हे तर कुणीच ड्रग्जच्या अधीन होता कामा नये. आपल्या देशावरचा हा व्यसनाधीनतेचा डाग पुसला गेलाच पाहिजे एवढे सामान्य माणसाला मनापासून मनापासून वाटते.

धन्यवाद!!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.