Blog by Harshal Alpe: टीम इंडिया, कोण होतीस तू, काय झालीस तू ?

एमपीसीन्यूज : लहानपणी ऑस्ट्रेलियाशी मॅच म्हणजे ती पहाटेच होणार. म्हणजे आपल्याला पाच वाजता उठून बघायला लागणार, ही मानसिकता असायची. त्यात पुन्हा आदल्या दिवशी सचिन किंवा द्रविड आणि लक्ष्मण खेळत असतील तर झोपेच खोबर निश्चितच. मग साधारण यातले दोन वीर टिकणार आणि आपल जागण सार्थ ठरवणार. त्यात जर सचिनची सेंच्युरी लागत असेल तर , तर काय ? शाळेला सुट्टी !

अशातच आता “ते” दिवस येणे पुन्हा शक्य नाही. त्या मुळे मनाच्या समाधानासाठी आणि कोविडच्या या संकट काळात काही तरी दिलासा हवा , म्हणून इंडिया औस्ट्रेलिया सामन्यांकडे डोळे लावून बसलेला माझ्यासारखे क्रिकेट वेडे असे अनेक असू शकतात. त्यांना औस्ट्रेलियाशी आक्रमक पणे केलेले दोन हात पाहायचे असतात. कारण आम्हाला तसच पाहायच असतं.

ती दृढ निश्चयता, तो माज उतरवण्याचा आविर्भाव आणि तो रोमहर्षक विजय हे सगळ आम्हाला हव असतं. ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका म्हणजे हे सर्व अस आम्ही मनापासून मानतो. कोविड नंतर या वर्षात काहीतरी दिलासादायक न घाबरवणार काही तरी हव की नको ?. या वर्षात येणारी प्रत्येक गोष्ट कशी घाबरवू शकते ? हे ही एक कोडच आहे.

बर या ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर आपले गोलंदाज आम्हाला ते दिवस पुन्हा आणू पाहात होतेच की. जसप्रीत बूमराह, तो उमेश यादव या जलदगती (खरोखरचे जलद बर का ? ) गोलंदाजांसमोर आत्ताचे ऑस्ट्रेलियन फलंदाज गुडघे टेकतच होते. त्यात शमीला विकेट जरी नाही मिळाली तरी त्याच्या गोलंदाजीवर उडालेले झेल पाहाता तो ही यांच्याच पावलावर पाऊल ठेऊ पाहत होता आणि आपली गुणवत्ता सिद्ध करत होता. आश्विन सारख्या ऑफ स्पिनरने तर ऑस्ट्रेलियन फलंदाज अजून ही ऑफ स्पिनला घाबरतात हेच सिद्ध केल … मग चुकल कुठे ???

विजयाची सगळी तयारी होत होती फक्त मांडवाच शेवटच काम फक्त बाकी होत. ते एकदा झालं असतं की उत्सव साजरा करायला आम्ही मोकळे ,पण झालं भलतच ?. 36 धावात सर्व गडी बाद ( म्हणजे शेवटचा शमी जायबंदी झाल्याने तशा 9 विकेट्स पण सगळेच गेले घरी ) हे चित्रच भयानक आहे.

यातून खेळाडूंनी सावराव, ते सावरतील ही , पण उगाच निचांकी धावसंख्येचा विक्रम जो आपल्या नावावर आधी होता (42 ) तो मोडायची खरच गरज नव्हती. ज्यांनी ग्लेन मेग्राला पाहिलाय त्यांना आजचा जौश हेजलवूड हा त्याच्याच वारसा मिरवणार्‍या गोलंदाजाच्या भीम पराक्रमाच कौतुक वाटतच. पण त्या ही पेक्षा वाईट वाटत “की कोण होतास तू काय झालास तू” हेच गाण आता पुढची मॅच येईपर्यंत तरी आम्ही गुणगुणार इतकच ….

(ता . क : विराट काही वैयक्तिक कारणांसाठी आता भारतात येतोय. हरवलेली आत्मविश्वासाची आणि विजयाची चावी त्याने राहाणेला शोधायला मदत करूनच भारतात यावे एवढेच वाटते )

लेखक : हर्षल आल्पे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.