Blog By Ramdas Kakade : मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार मावळभूषण माजी आमदार कृष्णरावजी भेगडेसाहेब!

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार मावळभूषण माजी आमदार कृष्णरावजी भेगडेसाहेब आज दि 10 ऑगस्ट रोजी 86 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त उद्योजक व इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांचा विशेष लेख 

एक भीष्माचार्यी व्यक्ती म्हणून संपूर्ण पुणे जिल्हा त्यांच्याकडे आदराने पाहतो आहे. राजकारणामध्ये संयम, विवेक व व्यापकता अशी सुसंस्कृत विचारसरणी रूजवणाऱ्या लोकनेते कै. यशवंतरावजी चव्हाण यांच्या विचारांचे पाईक म्हणून भेगडेसाहेबांकडे पाहिले जाते. पद्मविभूषण खासदार शरदराव पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्र भेगडेसाहेबांना ओळखतो.!

मावळच्या विकासाचा चेहरा म्हणजे कृष्णराव भेगडेसाहेब. शैक्षणिक, सामाजिक, सहकार, राजकीय,सांस्कृतिक या क्षेत्रात मावळ तालुक्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे कृष्णराव भेगडे साहेब. साहेबांच्या दूरदृष्टीपणामुळेच आज मावळ तालुका सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर पोहोचला आहे. मावळच्या विकासाची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थाने कोणी रोवली असेल तर ती आदरणीय कृष्णराव भेगडे साहेब यांनीच!

एका गरीब शेतकरी कुटुंबात 10 ऑगस्ट 1936 रोजी भेगडे साहेबांचा जन्म झाला. अत्यंत सर्वसामान्य असलेले हे शेतकरी कुटुंब. वडील धोंडीबा आणि आई सईबाई या मातापित्यांच्या पोटी कृष्णराव या अभिमानी कर्तुत्ववान पुरुषाने जन्म घेतला. आपल्या मुलांने खूप शिकावे, बॅरिस्टर व्हावे, मोठ्या पदावर विराजमान व्हावे, अशी या मातापित्यांची अपेक्षा होती.पण, दुर्दैवाने साहेब लहान असताना त्यांचे मातृछत्र हरपले.

त्यानंतर चुलती गंगुबाई यांनी आपल्या मायेच्या छत्राखाली भेगडे साहेबांना घेतलं. त्या काळात शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचली नसताना भेगडे साहेबांना शिक्षणाकडे वळवलं. साहेबांच्या शिक्षणामध्ये गंगूकाकूंचे योगदान फार मोठे आहे. नूतन विद्या मंदिर शाळा क्रमांक एक येथे साहेबांचे प्राथमिक शिक्षण सुरू झाले. त्या काळात तळेगावमध्ये फारशा शाळा – कॉलेज नसल्यामुळे त्यांनी पुण्यातील मॉर्डन हायस्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय, वाडिया महाविद्यालय, विधी महाविद्यालय असा शिक्षण प्रवास केला. तद्नंतर शिक्षण क्षेत्रातच आयुष्य समर्पित करण्याच्या ध्येयाने साहेबांनी शिक्षक म्हणून नोकरी स्वीकारली. आणि शिक्षण क्षेत्रात सिंहाचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला.

सुरुवातीला राजकीय जीवनात जनसंघात दाखल झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार त्यांच्यावर घडले. तिथूनच त्यांच्या कर्तृत्वाची गरुडझेप सुरू झाली. तळेगाव नगरपरिषदेत नगरसेवक आणि नगराध्यक्ष, नंतर पुणे जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या संघटनेचे कार्यवाह तसेच तळेगावमधील विविध कार्यकारी संस्थांचे अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या मावळ तालुक्यातील खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदी विविध पदांवर त्यांनी 1966 ते 74 या काळात काम केले. या माध्यमातून साहेबांनी मावळ तालुक्याची सामाजिक क्षेत्रातील एकजूट व विकासाची गंगोत्री उभी करण्याचा ध्यास घेतला.आणि त्याच माध्यमातून आज मावळ तालुक्याचा या सर्व क्षेत्रातील चेहरामोहरा आमूलाग्र बदलला आहे. यात साहेबांचे योगदान निश्चितच वरचे आहे.

1972 ला विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेली आमदारकी असेल किंवा 1976 मधील काँग्रेस पक्षातील प्रवेश असेल, किंवा 1978 मध्ये काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवून मावळ तालुक्यातून आमदार होऊन केलेला प्रवास असेल, हा सर्व प्रवास थक्क करणारा आहे. बिनविरोध निवडून येण्याचे भाग्य सर्वसामान्यपणे लाभत नाही. मात्र, साहेबांना बिनविरोध आमदार म्हणून निवडून येण्याचे भाग्य लाभले. हे केवळ भाग्य नव्हते तर त्यांनी मावळच्या विकासाच्या शिल्पकाराची केलेल्या भूमिकेची पावती होती.

अत्यंत नि:स्वार्थी व्यक्तिमत्व असलेल्या कृष्णराव भेगडे साहेबांनी शिक्षण क्षेत्रामध्ये मावळ तालुक्याची मान आणि शान आज महाराष्ट्रामध्ये उंचावली आहे. इंद्रायणी विद्या मंदिर संस्था, इंद्रायणी महाविद्यालय, लोणावळा आयटीआय, वडेश्वर आश्रम शाळा, तळेगाव मेडिकल कॉलेज, नुतन विद्या प्रसारक मंडळ, तळेगाव जनरल हॉस्पिटल या सर्व शैक्षणिक संस्थांच्या उभारणीमध्ये साहेबांचं योगदान हे फार मोठे आहे. एकाच वेळेस शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार, समाजकारण आणि राजकारणात यशस्वी ठरलेले व्यक्तिमत्व म्हणजे कृष्णरावजी भेगडे साहेब !

सहकार क्षेत्रात संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, मावळ तालुक्यात चालणाऱ्या त्या काळातील सर्व भात गिरण्या, कृष्णराव भेगडे सहकारी पतसंस्था, मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्था, लोणावळा औद्योगिक सहकारी वसाहत, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, दुग्ध विकास सहकारी सोसायट्या आणि पोल्ट्री व्यवसाय अशा सर्व सहकारी संस्थांमध्ये भेगडे साहेबांचे योगदान अमीट आहे.

राजकारणात अनेक वर्षे राहून भेगडे साहेबांनी कायमच विकासाचं राजकारण जोपासले. आपले व्यक्तिमत्व निष्कलंक ठेवले. कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता सर्वसामान्य माणूस हेच आपले दैवत आहे हे लक्षात घेऊन साहेबांनी मावळ तालुक्याचा आणि मावळमधील भूमिपुत्रांच्या विकास घडवून आणण्यासाठीच राजकीय खुर्चीचा वापर केला. एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून साहेबांचं कार्यकर्तृत्व आज तरुण पिढीला नक्कीच प्रेरणादायी आहे .समाजकार्याची निष्ठा आणि बांधिलकी हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खास पैलू आहेत.

मावळचा चेहरामोहरा बदलला पाहिजे यासाठी जर कोणी दूरदृष्टीने विचार केला असेल तर तो खऱ्या अर्थाने साहेबांनीच केलेला दिसून येतो. आज मावळमध्ये इतर तालुक्यांच्या तुलनेत सर्वच क्षेत्रात विकास झालेला दिसून येतो. त्या विकासाचे पाईक व महामेरू म्हणून भेगडे साहेबांना पिढ्यानपिढ्या ओळखले जाईल. त्यांच्या या सर्व कार्याला मावळ वासियांच्यावतीने मानाचा मुजरा !

मावळभूषण, माजी आमदार श्री. कृष्णरावजी भेगडेसाहेब यांचा दहा ऑगस्ट रोजी वाढदिवस संपन्न होत आहे. भेगडे साहेबांना वाढदिवसाच्या निमित्ताने मावळच्या तमाम जनतेच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !

आदरणीय कृष्णरावजी भेगडे साहेबांनी वयाची 85 वर्षे पार करून 86 व्या वर्षात पदार्पण केले आहे. साहेबांना निरोगी व उदंड आयुष्य लाभो, अशी परमेश्वर चरणी प्रार्थना ! मावळ तालुक्याच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने लाख लाख हार्दिक शुभेच्छा व अभिष्टचिंतन!

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.