गुलाबाच्या पाकळ्या!

एमपीसी न्यूज – प्रसिद्ध इंग्लिश नाटककार विल्यम शेक्सपियर यांचा २३ एप्रिल हा जन्मदिन. शेक्सपियर यांच्या सन्मानार्थ हा दिवस ‘जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो. बदलत्या काळानुसार पुस्तकांचं स्वरूप ही बदललं. इ बुक्स आणि स्टोरीटेलिंगच्या जमान्यात एका पुस्तकाने व्यक्त केलेले मनोगत. जागतिक पुस्तक दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार राजन वडके यांचा लेख…..

गुलाबाच्या पाकळ्या

बऱ्याच वर्षांनी भरपूर मोकळा वेळ मिळाल्याने आज सकाळीच लवकर उठून गेली अनेक वर्षे अस्ताव्यस्त पडलेली पुस्तके लावायला घेतली. प्रत्येक पुस्तक विषयवार बाजूला काढताना चाळले जात होते. पुस्तक चाळताना त्याच्या पानोपानी लपलेल्या आठवणी चळावल्या जात होत्या.
साहजिकच मन भूतकाळात जात होते. प्रत्येक पुस्तकांत वेगळी आठवण. त्यातच एक पुस्तक चाळताना पानांमध्ये सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या दिसल्या अन् मी थांबलो. किमान 30-35 वर्षांपूर्वी त्या पाकळ्या मी पुस्तकात ठेवल्या असतील. त्या पाकळ्यांना हळूवार स्पर्श केला आणि पुस्तक नाकाजवळ नेत वास घेतला. पाकळ्या सुकल्या असल्या तरी सुगंध तोच होता. पुस्तक जीर्ण झालं असलं तरी त्याच्या जुनाट वासाने मन भरून आलं. दीर्घ श्वास घेत पाकळ्या आणि पुस्तकाचा वास छातीत साठवून घेत होतो. त्यावेळी अंगावर काहीसे शहारे आल्याचं जाणवलं.

‘राजू, कसा आहेस’, या प्रश्नाने मी चमकलो. आसपास कोणीही नव्हतं, पण मला शब्द ऐकू आले… अरे, इकडं-तिकडं काय बघतोस, मी तुझ्या हातातचं आहे. किती वर्षांनी तू मला जवळ घेतलंस. आत्ता तू माझ्या सर्व भावंडांच्या गराड्यात बसला आहेस. भूतकाळातील आठवणींत तू रमला आहेस. मलाही भूतकाळ आठवू लागलायं. किती धमालं होती ना तेव्हा. त्यावेळी अबालवृद्ध सर्व जण माझ्यासकट माझ्या सर्व भावंडांना जवळ घेत. सिद्धहस्त प्रतिभावंत लेखकांनी आमच्या पानांवर उतरवलेली कथा, कादंबरी, कविता आवडीने वाचतं असतं. त्यात रमून जात असताना स्वतःलाही शोधत असतं.

आपापल्या आवडीनुसार पुस्तकं वाचताना त्यातील प्रसंगांची अनुभूती घेत. चांदोबा, वेताळ, बिरबल, शेखचिल्लीच्या गोष्टी वाचताना छोटी मंडळी आनंदून जात. पुस्तकांचा हट्ट धरत. राजाराणी, संत, महापुरुष, क्रांतिवीर, समाजसुधारकांच्या गोष्टी सांगत आई-वडील मुलांवर संस्कार करतं.
आई-वडीलांनी सांगितलेल्या संत-महात्मे, महापुरुष, क्रांतिकारकांच्या गोष्टींची पुस्तके प्रत्यक्ष वाचताना तरुणांना स्फुरण चढे. गुप्तहेरांच्या गोष्टी वाचताना आपणही गुप्तहेर होऊन चोर, दरोडेखोरांचा छडा लावून त्यांना शिक्षा करावी असं वाटे. प्रेमकथा-काव्य वाचताना तरुण-तरुणी मोहरून जात. काही जणांना विरह सहन होत नसे. विनोदी कथा वाचताना मोकळेपणानं हसतं, तर विरहाने व्याकूळ झालेल्यांच्या आणि दुःखद प्रसंग वा चलता ना डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागत.

पौराणिक, ऐतिहासिक, क्रांतिकारी, सामाजिक, सुधारणावादी, राजकीय, वैज्ञानिक, गूढ व भयकथा, प्रेम, निसर्ग, विनोदी, चरित्र, आत्मचरित्र, दलित, स्त्रीवादी आदी असंख्य साहित्यप्रकारांनी समृद्ध असलेल्या मराठी साहित्याने आमची पाने भरून गेली आहेत. हे साहित्य वाचताना अनेक जण आमच्या पानांतील उतारेच्या उतारे, कवितेच्या ओळी एखाद्या वहीत उतरून काढतं. विशिष्ट मजकुरांच्या ओळींखाली पोन्सिल किंवा लाल रंगांच्या रेघा ओढल्या जात. काही पाने वरून दुमडून ठेवली जात, पानांवर चित्रे काढली जात, आमच्या पानांमध्ये पिंपळ पान, मोरपिसे किंवा गुलमोहोर आणि
अशा गुलाबांच्या पाकळ्या ठेवत.

मित्र-मैत्रिणी, नातेवाईक एकमेकांना भेटले की गप्पांच्या मैफलीत ययाती, मृत्युंजय, राजा शिवछत्रपती वाचलं का, बहिणाबाई, शांता शेळके, बालकवींच्या कविता वाचल्या का, असे विचारलं जाई. पु. ल., मिरासदार वाचताना हसून पोटात गोळा उठतो रे, असं लोक सांगत. तुझ्याकडे बाबा कदम, नारायण धारपांची कादंबरी आहे का रे, बाबासाहेब आंबेडकरांचं आत्मचरित्र कोणाकडे आहे का, असे विचारताना माझ्याकडे कुसुमाग्रज, गदिमा, ना. सी. फडके, गोनिदांची पुस्तकं आहेत, असं अभिमानानं सांगितलं जाई. त्या गप्पांत प्रत्यक्ष आम्ही नसलो तरी मराठीतील साहित्यिकांमुळे त्यांच्या पुस्तकांची चर्चा होई. यामुळे तुमच्या हातात, मनांत, हृदयांत आम्हाला स्थान असल्याचं भाग्य आहे या जाणीवांनी आम्हाला अभिमान वाटे.

कालानुरूप आम्हा पुस्तकांचं स्वरूपही बदलत गेलयं. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आमची जागा इ-बुक्सनं घेतली, अभिवाचन आणि स्टोरीटेलिंगमुळे वाचक श्रोता झालायं. आमचं डीजिटायझेशन होऊ लागलयं. साहित्य टिकविण्यासाठी हे आवश्यकही आहे. इंटरनेटच्या युगात सोशल मीडियाच्या माध्यमांतून लोक साहित्याचा आनंद घेत राहतील. पण कायरे त्यात आम्हाला हातात घेतल्याच्या स्पर्शाची आपुलकी आहे, यात कोणत्या पानाला तुम्ही घडी घालणारं आणि काय रे मोरपिस, पिंपळ पान, गुलमोहर आणि गुलाबाच्या पाकळ्या कुठे ठेवणार?

मी बिचकलो, पाहिलं तर माझ्या हातात उघडलेलं पुस्तक होतं. पण त्यातील पाकळ्या उडाल्या होत्या.

– राजन वडके

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.