Blog by Vivek Kulkarni : मनाचे ओझे

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – कधी कधी कळत नकळत अशा दुःखद वा कटूगोष्टी कानावर पडतात, अनुभवता येतात ,ज्या समजल्यावर तुम्ही आम्ही अंतर्बाह्य हादरुन जातोत,संवेदनशील मन बोथट होते,अथवा परमेश्वराने अशी कुबुद्धी का द्यावी असे असंख्य प्रश्न पडतात.

मागच्या काही काळात करोना या भयानक रोगाने थैमान घातलेले असल्याने मी स्वतः किमान सकाळी तरी वर्तमानपत्र वाचत नाही, टीव्हीवरील बातम्या ऐकत नाही, तरीही नको असणाऱ्या आणि वाटणाऱ्या बातम्या आपल्याला कळतातच.दोन ओळखीतल्या कुटुंबातील दोन उच्चविद्याविभूषित आणि एनआरआय मुलींच्या बाबतीतल्या गोष्टीने मी अंतर्बाह्य हादरून गेलो.

एक सुंदर, बुद्धिमान, देशविदेश पादाक्रांत करणाऱ्या 35 च्या आतल्या मुलीने न जानो कुठल्या कारणाने आपल्या पोटच्या गोळ्याला तेही केवळ तीन वर्षे असलेल्या लेकीला मारून टाकले, दुसऱ्या घटनेत एका खूप मोठ्या पदावर असलेल्या मुलीने वयाच्या तिशीच्या आतच आपल्या वार्षिक लाखो रुपये पगार देणाऱ्या नोकरीला विसरून, आपल्या पोटच्या लेकीला त्यागून आपल्या वृद्ध आई-वडील यांचा विचार सुद्धा न करता आपल्याच हाताने आपला जीव घेतला.

दोन्ही घटना कळाल्यावर माझे मन अतिशय सुन्न झाले. दोन्हीही मुलींच्या आयुष्यात प्रतिवर्षी किमान 70 ते 80 लाख रुपये पगार येत असे, महागड्या गाड्या, अलिशान घरे, प्रतिष्ठा, विदेशात वारंवार राहण्याची संधी या प्रत्येक माणसाला स्वप्नवत असणाऱ्या गोष्टीची रेलचेल होती. तरीही त्यांनी असे काळजाला छिद्रे पाडणारे पाऊल का बरे उचलले असेल?

नक्कीच त्यांच्या आयुष्यात दुःखे असतील, विवंचना असतील, पण म्हणून जीव देणे वा जीव घेणे हे कुठल्या प्रश्नावरचे उत्तर आहे? आपल्या मनातील दुःखाला त्यांनी का कोणाजवळ मोकळे केले नसेल?इतके सर्व जवळ असूनही मनातील भावना, मळमळ, तळमळ कोणा जवळही का त्यांना सांगता आली नाही?

प्रश्न सुटतच नाही असा खरेच कुठला प्रश्न असतो का हो? अशी समस्या असते जिला काहीच मार्ग नाही?

दोघी मुलीना पाठीमागे आईवडील आहेत, तेही वृद्ध, आजारी, काय त्यांच्या भावनेचा, आपल्या नंतर त्यांची अवस्था काय होईल, असा विचार त्यांच्या मनात असले पाऊल उचलण्याआधी आलाच नसेल? प्रश्न, प्रश्न आणि नुसते प्रश्न, ज्यांची उत्तरे सापडतच नाहीत.

हल्ली दुर्दैवाने प्रत्येक व्यक्ती आत्मकेंद्रित व्हायला लागली, हातात मुबलक पैसा, तोही कमी वयात त्यामुळे डोक्यात गेलेले यश, त्या बरोबर आलेला अहं यामुळे अतिशय सुंदर असे आयुष्य पण ते दुर्दैवाने क्लिष्ट झालेले आहे.

ज्याच्या जवळ मनातली सर्व भडास मोकळी केली जावू शकते, पण असे खरेखुरे मित्र कोणाजवळ आहेत? प्रत्येकजण स्वार्थात अडकलेला दिसतोय. संशय तर प्रत्येक नात्यात रक्त आणि श्वास यापेक्षाही महत्वाचा घटक झालाय आणि त्यामुळेच मनात आलीय ती असुरक्षितता.

कोणी आपले दुःख जाणले तर? आपल्या अडचणी जगाला समजल्या तर? आपल्या प्रतिष्ठेचे काय होईल? हा कळीचा प्रश्न मनाला सैरभैर करतो. त्यातून वैफल्य वाढत जाते आणि मग त्यातून हे असे पाऊल उचलले जाते, पण याने केवळ आणि केवळ फक्त स्वतःचेच नुकसान होते.

म्हणूनच सृजनशील मना रे, मोकळा हो, एखाद्याजवळ तरी आपले मन,खदखद, वैफल्य व्यक्त कर. त्यामुळे उत्तर तरी मिळेल, नाहीच मिळाले तरी तुझ्या मनावरचे ओझे तरी कमी होईल आणि त्या उतरलेल्या ओझ्यामुळे तुझ्या मनाचा ताण तरी जाईल.

लक्षात ठेवा संकटात भिऊन पळणे यापेक्षा त्या संकटाला धीरोदात्तपणे तोंड देणे हाच खरा पुरुषार्थ आणि हेच खरे सुंदर जीवन जगणे नाही का? विचार करा आणि मनाचे ओझे कमी करा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.