Blog by Harshal Alpe : एखाद्याच्या अपयशाला खरंच घराणेशाही जबाबदार असते???

Blog by Harshal Alpe : Is nepotism really responsible for one's failure? सुशांतच्या प्रकरणातून एक धडा मिळालाय की आपण बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे, अशी अनेकानेक व्यासपीठं तयार केली पाहिजेत, जिथं मुक्त चर्चा होऊ शकते...

एमपीसी न्यूज – सुप्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर जे काही सर्वाधिक चर्चिले गेले असेल तर ते म्हणजे नेपोटीज्म म्हणजेच घराणेशाही… खरंच , ही घराणेशाही आपल्या भारतात सगळीकडे आजही आपले अस्तित्व टिकून आहे. थोडंसं इकडे तिकडे बघितलं तर सर्वच क्षेत्रात ते थोड्या फार फरकाने आहेच, आता घराणेशाहीमधून पुढे आलेली लोक किती यशस्वी होतात, हा कदाचित चर्चेचा मुद्दा होऊ शकतो, पण आयुष्यातली पहिली संधी ही काही “नशीबवान” लोकांना लवकर मिळू शकते, जी कदाचित एकेकाला, त्या क्षेत्रात कुणीही “गॉडफादर” नसेल तर खूप मेहनत करून मिळवावी लागते, हे आजचं वास्तव आहे आणि हे कुणीही नाकारू शकत नाही.

सुशांतला अशा प्रकारे कुणी गॉडफादर नव्हता. त्याने यश मिळवलं ते स्वत:च्या बळावर, आणि म्हणूनच ते महत्त्वपूर्ण होतं. त्यात काही तरी कमी होतं, त्यासाठी त्याचा जीव तळमळत होता, हे वास्तव असेल कदाचित. त्याचे काही प्रोजेक्टस त्याच्या हातून निसटलेही असतील, पण त्याच्या जाण्याने खरच प्रश्न संपले का?… नाही, उलट ते अधिक गुंतागुतीचे झाले. या प्रश्नांची उकल आणि खरे गुन्हेगार कोण? की आलेली परिस्थितीच गुन्हेगार, ते येणारा काळच सांगेल, पण या निमित्ताने यावर चर्चा होत आहे, ही एका सुदृढ समाजासाठी चांगली गोष्ट आहे.

खरतर या गोष्टीला खूप रंग आहेत. खूप छ्टा आहेत. घराणेशाहीवर बोलत असताना, जे खरोखरच यशस्वी होऊ शकले नाहीत, सर्व असून सुद्धा, मुद्दा तर त्यांच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहेच. त्यांना पहिली संधी मिळाली, त्यात ते वडिलांशी झालेली तुलना आणि त्यांची स्वतःची असलेली तोकडी प्रतिभा याचा सामना ते करू शकले नाहीत. आज काय होतंय, जेव्हा या गोष्टींवर चर्चा होते, तेव्हा यशाची जशी नावासकट चर्चा होते, त्याहूनही जास्त चर्चा ही अपयश मिळवणार्‍यांची होते आणि हे अत्यंत वाईट आहे, अन्यायकारक आहे!

आता घराणेशाहीचा फायदा उठवणार्‍यांना सुद्धा सातत्याने काम मिळेलच याची शाश्वती देता येत नाही. याचं कारण 21 व्या शतकात आपण अत्यंत वस्तुनिष्ठ विचार करणार्‍या नवीन पिढीला पाहणार आहोत. त्यांच्याकडे कदाचित काम दाखव नाही तर घरी जा, असा विचार त्यांच्या मुळातच रुजलेला असणार आहे आणि तो विचार आजची परिस्थितीच रुजवत आहे. हे लक्षात घ्या… कोरोनाच्या या संपूर्ण काळानंतर जेव्हा सर्व काही सुरळीत झालेलं असेल, तेव्हा प्रत्येकजण हा जगाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी धावत सुटणार आहे. अशा वेळी घराणेशाही , कंपूशाही कितपत टिकेल याची शंका वाटते.

टिकून राहण्याच्या या महासागरातल्या त्सुनामी पुढे वशिलेबाजीचा टिकाव लागणं अवघड आहे. या सगळ्या काळात तुम्ही तुमचं ज्ञान वाढवा आणि मगच काम मागा, असा सरळसोट संदेशच हा सगळा काळ आपल्याला देत आहे. तो आपण ऐकला पाहिजे. खर्‍या घराणेशाहीला आणि कंपूशाही, झुंडशाहीला थारा द्यायचा नसेल तर, मात्र पहिल्यांदा आपल्याला आपल्या ‘इगो’ला सोडावं लागेल, कारण तोच राजकरणाला आणि इतर अनेक वाईट प्रवृत्तींना जन्म देतो, हे वास्तव आहे.

या सगळ्यात एक नवीन प्रवृत्ती उदयाला येत आहे आणि ती बाकीच्या गोष्टींइतकीच घातक आहे. ते म्हणजे आपलं ठराविक गोष्टींच्या बाबतीत ठरवून गप्प बसणं, हे मारक आहे. हल्ली अन्याय होत असेल तर समाजातला एक ठराविक वर्ग हा काहीच बोलत नाही. ‘जाऊ दे नं, मला काय त्याचे?’ असं म्हणून गप्प पाहत राहतो आणि त्यानंतर घडलेल्या वाईट घटनेनंतर “मला हे होणार, हे आधीच माहीत होतं” असं म्हणून आपली शेखी मिरवतो, मग अशा वेळी विचारावंसं वाटतं की, “त्यावेळी तुम्ही का गप्प होता?” या वर उत्तर म्हणजे , “मला कुणी विचारलंच नाही!”

स्वत:हून पुढे येऊन काही तरी होकारात्मक करण्याची वृत्ती नष्ट होणं, ही समाजासाठी एक प्रकारची आत्महत्याच असते आणि हा उपदेशाचा डोस नाहीय. तर खरंच हे व्हायची गरज आहे, अशा आत्महत्या वेळीच रोखल्या पाहिजेत…

सुशांतच्या प्रकरणातून एक धडा मिळालाय की आपण बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे, अशी अनेकानेक व्यासपीठं तयार केली पाहिजेत, जिथं मुक्त चर्चा होऊ शकते… बोलण्यामुळे, व्यक्त होण्यानेच आपण जवळ येऊ शकणार आहोत… आणि जो कोणी सुशांत सारखा विचार करण्यापर्यंत पोहोचत असेल त्याला आपण बोलून, मार्ग काढून आत्महत्येसारखी कृती करण्यापासून रोखलं पाहिजे,  इतकंच !

लेखक : हर्षल विनोद आल्पे, तळेगाव दाभाडे 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like