Blog On Electronic Media: इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सुशातसिंह राजपूत प्रकरण..

आक्रस्ताळेपणाने ओरडणे, चर्चेत एखाद्याला आपली बाजूच मांडू न देणे, आलेल्या वक्त्याचा सन्मान न करणे, त्याला अद्वा-तद्वा बोलणे हे असले प्रकार लांछनास्पद आहेत.

एमपीसी न्यूज- सध्या अभिनेता सुशांतसिंह राजपूत हत्या प्रकरणाचे विश्लेषण करण्याचा आणि वार्तांकन करण्याचा प्रयत्न प्रत्येक इलेक्ट्रॉनिक माध्यमे करत आहेत. समाज माध्यमेही या कामात कुठेही कमी नाहीत. कुठल्याही चॅनलवर दिवसातून कुठल्याही वेळी हीच बातमी चालू असते. विशेषत: हिंदी आणि इंग्रजी भाषिक माध्यमांवर तर हमखास आहेच आहे. जसे काही कोरोना नावाची महामारी कधी नव्हतीच, अशा आविर्भावातच ही माध्यमे वावरत असल्याचे जाणवत आहे.

स्थानिक प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करून कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी झगडत आहे. काही अक्षम्य चुका होत आहेत मान्य. पण जसं दिसतं तसेच ते समाजात परावर्तित होतं. एकीकडे फिजिकल डिस्टन्सिंग ठेवा असा संदेश सगळीकडे दिला जातो. मग समाज प्रबोधनाचा वसा घेतलेल्या या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांनी फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पाळायचा नाही का?

रिया चक्रवर्ती चौकशीला जातानाच्या गोष्टीचे वार्तांकन करताना हे भान आमचं सुटतंच कसं ? इकडे लग्नापासून ते प्रत्येक समारंभात फिजिकल डिस्टन्सिंगच्या नावाखाली मर्यादित संख्या अपेक्षित असताना,  तसं न झाल्यास सामान्य माणसावर कारवाई होत असताना यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही, ही खेदाची बाब आहे. जो न्याय सर्वांना तोच पत्रकारांना ही लागू व्हायलाच हवा. शेवटी तेही या समाजाचाच भाग आहेत ना.

या हिंदी, इंग्रजी माध्यमांची आणखी एक गोष्ट खटकते. ती म्हणजे कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत आणि इतरबाबतीतही एकही सकारात्मक बातमी दुर्दैवाने दिसत नाही. याचे काय कारण असावे ? संयम जो की निरपेक्ष पत्रकारितेचा प्राण आहे, तोच आज हरवत चाललेला आहे.

आक्रस्ताळेपणाने ओरडणे, चर्चेत एखाद्याला आपली बाजूच मांडू न देणे, आलेल्या वक्त्याचा सन्मान न करणे, त्याला अद्वा-तद्वा बोलणे हे असले प्रकार लांछनास्पद आहेत.

एक उदाहरण म्हणून सांगतो, एका अशाच चर्चेत सुप्रसिद्ध वकील ज्यांनी कसाबला फाशी मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली, असे उज्वल निकम बोलत असताना तो निवेदक आणि त्या चॅनलचा संपादक त्यांच्या अंगावर ओरडला. ते ही त्यांचं म्हणणं न ऐकता, तेव्हा खरच कीव आली. जेव्हा पूर्ण ऐकून घेतले तेव्हा तो संपादक शांत झाला. हा एक प्रकार आणि मुळात ओरडण्याची गरजच काय ? जे प्रश्न तुम्हाला शांत राहून ही विचारता येतात त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध असताना ओरडण्याची गरज च नाही.

तुम्ही सहज पुटपुटलात तरी प्रेक्षकांना तुमची भूमिका कळेलच की आणि हा चाललेला हीन प्रकार हे सुजाण लोकशाहीचे लक्षण निश्चितच नाही. पत्रकारिता रसातळाला घेऊन जाण्याचेच हे द्योतक आहे.

पुरावे संबंधित यंत्रणेला न देता त्याची जाहीर चर्चा करण हे सुद्धा खटकतंय. हे काम तपास कामात बाधा आणण्याचेच आहे. अधिकार्‍यांना एखाद्या ठिकाणी छापा मारत असताना मध्येच गाठून तेच तेच प्रश्न विचारणे ही विकृती आहे आणि या सगळ्या प्रकरणात याची परिसीमा बघायला मिळते आहे.

माझ्यासारख्या पत्रकारितेच्या विद्यार्थ्याला तर काय करू नये याचे धडेच मिळत आहेत. कुठे ती आदर्शवत पत्रकारिता आणि कुठे आजची इलेक्ट्रॉनिक माध्यमांची आक्रस्ताळी, वरवरची माहिती न घेणारी पत्रकारिता. योग्य धडा घेऊन विचार करायला हवा. संयम आणि योग्य माहितीच्या विश्लेषणानेच सुशांतसिह प्रकरणात न्याय मिळणार आहे.

  • हर्षल आल्पे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.