Blog: पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्या हो जरा…

blog on maharashtra police support पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले म्हणजे आपल्याला सगळेच काही कळते असे नव्हे. अनेकवेळा पोलीस हे आपलं कर्तव्य करण्यात कसलीही कसर सोडत नाहीत.

एमपीसी न्यूज- अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्याप्रकरणी सध्या रोज वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. विविध मान्यवरांच्याही प्रतिक्रिया येत आहेत. कोरोना सोडला तर या बातम्याच जास्त लक्ष वेधत आहेत. सत्य नक्की काय आहे, हे काळच सांगू शकतो.

परंतु, या निमित्ताने माजी मुख्यमंत्री असलेल्या आणि सध्याचे विरोधी पक्षनेते म्हणून समर्थ भूमिका पार पाडणार्‍या देवेंद्र फडणवीस यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांचे पोलिस आणि सामान्य माणूस आणि त्याची सुरक्षितता या बद्दलचे वक्तव्य वाचनात आले आणि धक्काच बसला.

त्या असं म्हणतात, सुशांत सिंहच्या प्रकरणावर बोलताना, सध्या पोलिस आपले कर्तव्य नीट बजावत नाहीयेत. सत्ताधार्‍यांचे म्हणणेच अग्रभागी मानून काम करत आहेत आणि त्यामुळेच सामान्य माणसाची सुरक्षितता धोक्यात आली आहे… वगैरे वगैरे…

या निमित्ताने त्यांना नम्रपणे सांगावंस वाटतं की, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले म्हणजे आपल्याला सगळेच काही कळते असे नव्हे. अनेकवेळा पोलीस हे आपलं कर्तव्य करण्यात कसलीही कसर सोडत नाहीत. आपल्या असलेल्या समस्या, कुटुंब यांना तिलांजली देऊन ते आपल्या कर्तव्यासाठी जिवाची बाजी लावत असतात, कोणासाठी ? सामान्यांच्या रक्षणासाठीच ना. कसलीही तमा न बाळगता ते तुमच्या आमच्यासाठी सदैव तत्पर असतात.

अगदी कोरोनाच्या काळात सुद्धा जेव्हा आपण आपल्या घरी लॉकडाऊनमध्ये होतो, आहोत. तेव्हा सुद्धा ते रस्त्यावर सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यरत आहेत. एकदा फक्त तुमचं रक्षण करता करता किती पोलिसांना कोरोना झालाय याची आकडेवारी नीट तपासा. बरं, या बदल्यात त्यांना मिळतं काय ? काहीच नाही.

एकदा फक्त पोलीस वसाहतींमध्ये जाऊन ते कसे राहतात. एवढं फक्त बघून घ्या, सरकार बदलत असतात. पण, पोलिसांचे हाल पोलिसांनाच ठाऊक असतात. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर बोट ठेवताना आधी आपल्या आत आपण झाकून बघितलेच पाहिजे.

आता प्रश्न सुशांत सिंह प्रकरणाचा. या प्रकरणात जर दिरंगाई होत असेल तर पोलिसांवर अविश्वास निर्माण करण्यापेक्षा ते कसे अकार्यक्षम आहेत हे इतर राज्यांना पटवून देण्यापेक्षा, त्यांच्यावर थोडासा विश्वास दाखवून, सत्ताधार्‍यांनी आणि विरोधकांनी त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करण्याचे स्वांतंत्र्य दिले पाहिजे.

मग बघा न्याय मिळतो की नाही ते. नुसतं बोट मोडून, बदल्या करून काही होत नाही. आपलं सर्वांचं पाठबळ त्यांच्यासाठी आवश्यक आहे. एकदा त्यांच्या समस्या सोडवून साथ देऊन तर बघा. पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्या इतकंच.

– हर्षल आल्पे

  तळेगाव दाभाडे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.