Blog: कोरोना आणि लॉकडाऊनचे फायदे

Blog written by Harshal Alpe on Corona and Benefits of Lockdown एवढ्या संधी असताना उगाच आपण रडत बसण्यापेक्षा एकदा या सगळ्याकडे सकारात्मक पद्धतीने बघण्याची गरज आहे.

एमपीसी न्यूज – कोरोना आणि लॉकडाऊन विषयी सध्या बरीच साधक-बाधक चर्चा सुरू आहे. काहींना हा विषय पटतोय तर काहींना अजिबातच हे पटत नाहीये. समाजातल्या बर्‍याच लोकांना याचा तोटा सहन करावा लागतोय. हे वास्तव आहे. पण,  जसं या जगामध्ये वाईट घडत असतं. नीट विचार केला तर चांगलं ही घडत असतंच की. चांगलं, वाईट आपण कस बघतोय यावर अवलंबून आहे.

पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं आणि अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतंच की. तसंच या लॉकडाऊनचे आहे. तोटा सहन करावा लागतोय हे मान्य, जेवणाचे हाल होताहेत मान्य, पण या सगळ्यात या मृत्यूची ही भीती आवश्यक होती ? निश्चितच होती, असं वाटते.

हे जीवन मिथ्या आहे. आपण उगाचच भलत्या गोष्टींच्या मागे धावतो. कष्टी होतो. आपलं घर, आपला परिवार सोडून आकाशात गगनभरारी मारायला बघतो. त्यावेळी एका जीवघेण्या स्पर्धेचा सामना करतच असतो.

दुसर्‍याच्या एक पाऊल पुढे जाण्याचा, त्याला मागे टाकण्याचा, खाली खेचण्याचा प्रयत्न ही करतो. पण हे सगळं कशासाठी ? याचा विचारच करत नाही. असल्या फुटकळ गोष्टींकडे पाहण्यासाठी आप्ल्याकडे वेळच नसतो. आपल्या प्रायोरिटीज एकदम सेट असतात.

वर्ष 2020 सुरू झालं तेव्हाही हेच सगळं सुरू होतं. या वर्षात काय करायचे आहे, याचेच आराखडे आपण बनवत होतो. त्याची अंमलबजावणी ही सुरू झाली होती. आपापल्या पातळीवर पण साधारण मार्चच्या महिन्यात हे कोरोनाचे गांभीर्य हळूहळू आपल्याला कळायला लागले आणि लॉकडाऊन लागू झाला आणि सगळंच ठप्प झालं.

आपण घरी राहायला लागलो. एक मिनिट विचार केला तर असं लक्षात आलं की या तीन–चार महिन्यांच्या कालावधीत आपण सगळेच, गरीब श्रीमंत, जाती–धर्म विसरून एकाच पातळीवर आलो. सगळेच घरी अन् धावणारे रस्ते शांत झाले.

मला वाटतं ही एक संधी आहे. दोन क्षण शांत बसून सगळ्या गोष्टींचा फेर आढावा घेण्याची ही संधी आहे. धावत असताना ज्या गोष्टी करायच्या राहून जातात त्या करण्याची सुद्धा संधी आहेच. शिवाय आपली विस्कटलेली नाती पुन्हा एका धाग्यात गुंफायची ही आयती संधी आहे.

एवढ्या संधी असताना उगाच आपण रडत बसण्यापेक्षा एकदा या सगळ्याकडे सकारात्मक पद्धतीने बघण्याची गरज आहे. आजूबाजूला टाहो फोडण्यासाठी खूप गोष्टी आहेत. पण, निवांत बसून, छान हसून परिस्थितीला सामोरं जाण्याचं बळ आपल्याला हाच लॉकडाऊन देतोय. तो आपण घ्यायलाच हवा. हा किती मोठा फायदा आहे, स्वतःशीच संवाद सांधण्याची. येणारा काळच ठरवणार आहे की यातून आपण किती गोष्टी शिकून पुढे जाणार आहोत.

वाघही झेप घेण्याआधी दोन पाऊले मागे टाकतोच की, तसेच आहे हे ! अगदी तसेच.

  • लेखक- हर्षल आल्पे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.