Nagpur: थरारक! स्टेरॉईड्सच्या अतिसेवनाने ‘हैवान’ बनलेल्या बॉडीबिल्डरने घेतला जन्मदात्याच्या नरडीचा घोट

एमपीसी न्यूज – काळजाचा थरकाप उडविणारी एक घटना नागपूरमध्ये घडली आहे. स्टेरॉईड्सच्या अतिसेवनामुळे उत्तेजित होऊन ‘हैवान’ बनलेल्या एका 25 वर्षीय बॉडी बिल्डरने चक्क जन्मदात्या वडिलांच्या नरडीचा घोट घेत त्यांची हत्या केली. या घटनेने नागपूर परिसर हादरून गेला आहे.

विजय गोविंदराव पिल्लेवार ( वय 55) असे हत्या झालेल्या दुर्दैवी पित्याचे नाव आहे. रोहित तथा विक्रांत विजय पिल्लेवार (वय 25, रा. जय विघ्नहर्तानगर, नागपूर) असे आरोपी मुलाचे नाव आहे. पोलिसांनी विक्रांत याला अटक केली आहे.

विक्रांत पिल्लेवार या तरुणाला शरीरसौष्ठवाची आवड आहे. गेली अनेक वर्षे व्यायाम करून त्याने शरीर कमवले होते, पण हे करताना त्याने स्टेरॉईड्स घ्यायला सुरुवात केली होती.

त्यादिवशी रात्री विक्रांतच्या घरचे सगळे टीव्ही पाहत बसले होते. कोणत्या तरी किरकोळ कारणावरून विक्रांत अचानक संतापला आणि अर्वाच्य शिवीगाळ करू लागला. त्याचा तो रुद्रावतार पाहून आईने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण विक्रांतने आईच्या श्रीमुखात भडकवली. त्यानंतर विक्रांतच्या वडिलांनीही त्याला आवरायचा प्रयत्न केला, पण त्यामुळे विक्रांत अधिकच हिंसक बनला. हिंदी सिनेमातले डायलॉग मारत त्याने एका ठोश्यातच वडिलांना खाली लोळवले आणि वडिलांच्या गळ्यासह शरिराच्या अनेक ठिकाणी कडकडून चावे घेतले. गुप्तांगाचे लचके तोडले.  जन्मदात्या वडिलांच्या नरडीचा घोट घेत विक्रांतने त्यांची निर्घृण हत्या केली.

पिल्लेवार यांच्या घरातील आरडाओरडा ऐकून शेजारी मदतीला धावून आले, पण स्टेरॉईडमुळे उत्तेजित झालेला विक्रांत 8-10 जणांनाही अनावर झाला होता. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यांनी विक्रांतला ताब्यात घेतले व पंचनामा करून वडिलांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

शरीर पीळदार करण्यासाठी आणि व्यायामाची क्षमता वाढवण्यासाठी बरेच तरुण सध्या ‘स्टेरॉईड्स’ घेत आहेत, मात्र या स्टेरॉईडचे अनेक दुष्परिणामही दिसत आहेत. स्टेरॉईडमुळे राग, द्वेष आणि क्रौर्य या भावना उत्तेजित होतात, अशी माहिती न्युरोसर्जन आणि मानसोपचार तज्ज्ञ देतात.

स्टेरॉईड्स शरीराला खूप घातक असतात, मात्र झटपट बॉडी बिल्डिंगच्या नादात अनेक तरुण ‘स्टेरॉईड्स’चा शॉर्टकट वापरत असल्याची खंत जुन्या-जाणत्या शरीरसौष्ठवपटूंनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.