Pimpri News: ‘बोगस एफडीआर प्रकरण, फसवणूक करणा-या ठेकेदारांकडूनच अर्धवट कामे पूर्ण करा’

स्थायी समितीचा ठराव

एमपीसी न्यूज : कंत्राट मिळविताना बनावट फिक्स्ड डिपॉझिट रिसीट (एफडीआर) आणि बँक हमी देऊन महापालिकेची फसवणूक करणा-या 18 ठेकेदारांना काळया यादीत टाकण्यात आले आहे. असे असले तरी त्यांच्याकडूनच अर्धवट कामे पुर्ण करुन घ्यावीत. प्रसंगी नवीन एफडीआर, बँक गॅरंटी घेवून  कामे मार्गी लावा असा ठराव स्थायी समितीने आज (बुधवारी) मंजुर केला.

मागील तीन वर्षातील सुमारे 107 कंत्राटांमध्ये बोगस एफडीआर आणि बँक हमी देऊन महापालिकेची फसवणूक करण्यात आली आहे. 17 डिसेंबर 2020 रोजी श्री. दत्तकृपा एंटरप्रायजेस, सोपान घोडके, दीप एंटरप्रायजेस, बी.के.खोसे, बी.के. कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड इंजिनिअरींग, एच.ए. भोसले, भैरवनाथ कन्स्ट्रक्शन, कृती कन्सट्रक्शन, डी.जे. एंटरप्रायजेस, म्हाळसा कन्स्ट्रक्शन, अतुल आर.एम.सी, पाटील अ‍ॅण्ड असोसिएटस, डी.डी.कन्स्ट्रक्शन, एस.बी.सवाई, चैतन्य असोसिएट्स, वैदेही कन्स्ट्रक्शन, त्रिमुर्ती कन्स्ट्रक्शन आणि राधिका कन्स्ट्रक्शन या ठेकेदारांना काळया यादीत समावेश करुन निविदा भरण्याबाबत प्रतिबंध करण्यात आला आहे.

स्थायी समितीच्या आज झालेल्या साप्ताहिक सभेत बोगस एफडीआर, बँक गॅरंटीविषयक आयत्या वेळी उपसूचना मांडण्यात आली. ठेकेदारांना काळया यादीत टाकण्याची कारवाई कायम ठेवण्यात यावी. तथापि, सध्या सुरु असलेली विकासकामे थांबू नयेत म्हणून खबरदारी घ्यावी. वर्क ऑर्डर निघालेल्या आणि अर्धवट कामे करणा-या ठेकेदारांकडून नवीन एफडीआर, बँक हमी घेऊन कामे पूर्ण करावीत. ज्या कामांचे आदेश निघाले नाहीत, अशी कामे दुस-या लघुत्तम दर सादर करणा-या ठेकेदाराला बहाल करावीत, असे ठरावात नमूद आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.