Shocking: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची गळफास घेऊन आत्महत्या

bollywood actor sushant singh rajput commit suicide at his residence by hanging himself in bandra त्यानंतर त्याने चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. त्याने 'काय पो छे' या चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती.

एमपीसी न्यूज- बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंह राजपूतने मुंबईत आपल्या वांद्र्यातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तो ३४ वर्षाचा होता. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, सुशांत गेल्या सहा महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होता, असे त्याच्या मित्रांनी पोलिसांना सांगितले आहे.  

सुशांत डिप्रेशनमुळे औषधे घेत होता, असे त्याच्या मित्रांनी सांगितले आहे. काल रात्री सुशांतबरोबर त्याचे काही मित्रही त्याच्याबरोबर होते. सकाळी सुशांतने जेव्हा दरवाजा उघडला नाही. तेव्हा त्याच्या मित्रांनी दरवाजा तोडला. त्यावेळी सुशांतचा मृतदेह पंख्याला लटकत होता. त्यानंतर त्याच्या नोकराने पोलिसांना फोन केला. पोलिस घटनास्थळी तपास करत आहेत.

सुशांतने आपल्या कारकीर्दीची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली होती. सर्वांत आधी त्याने ‘किस देश में है मेरा दिल’ नावाची मालिका केली होती. त्यानंतर त्याला खरी ओळख एकता कपूरची मालिका ‘पवित्र रिश्ता’ यातून मिळाली.

त्यानंतर त्याने चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. त्याने ‘काय पो छे’ या चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे मोठे कौतुक करण्यात आले होते.

त्यानंतर तो ‘शुद्ध देसी रोमांस’मध्ये वाणी कपूर आणि परिणीती चोप्राबरोबर दिसला होता. परंतु, तो सर्वाधिक चर्चेत राहिला तो टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनीवर आधारित  ‘एम. एस. धोनी, अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटामुळे. सुशांतचा पहिला सुपरहिट चित्रपट ठरला होता. या चित्रपटाने कोट्यवधी रुपयांची कमाई केली होती.

त्याचबरोबर सुशांत हा सोनचिडिया आणि केदारनाथसारख्या चित्रपटात दिसला होता. त्याचा शेवटचा चित्रपट हा ‘छिछोरे’ हा होता. यात तो श्रध्दा कपूर बरोबर दिसला होता. मागील आठवड्यातच त्याची माजी मॅनेजर दिशा सालियन हिचा देखील अचानक मृत्यू झाला होता.

सुशांतच्या आत्महत्येने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.