Bollywood: स्वप्नसुंदरी हेमामालिनी यांनी शेअर केल्या आईच्या आठवणी!

Bollywood: Memories of mother shared by dream girl Hema Malini on the occasion of Mother's Day!

एमपीसी न्यूज – संपूर्ण जगभरात मे महिन्यातील दुसरा रविवार मदर्स डे म्हणून उत्साहात साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधत स्वप्नसुंदरी हेमामालिनी यांनीदेखील त्यांच्या आईचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. हा फोटो त्यांच्यासाठी मौल्यवान असल्याचंही म्हटलं आहे.

आता सोशल मिडियावर आपण सगळेच अॅक्टिव्ह असतो त्यामुळे आजच्या दिवशी या माध्यमातून प्रत्येकजण व्यक्त होत असतो. आज अनेकांनी आपल्या आईसोबतचे फोटो आपले डीपी, स्टेटस, प्रोफाइल फोटो म्हणून ठेवले आहेत. चित्रपट तारे तारका देखील यात मागे कसे राहतील. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आईबद्दलच प्रेम, तिच्या आठवणी शेअर केल्या आहेत. स्वप्नसुंदरी हेमामालिनी यांनीदेखील त्यांच्या आईचा फोटो शेअर केला आहे.

हेमामालिनी यांचे चित्रपटसृष्टीतील करियर घडवण्यामागे त्यांची आई जया यांचा खूप मोठा हात आहे. त्या खंबीरपणे हेमा यांच्यामागे नेहमीच राहिल्या. स्वप्नसुंदरी हेमामालिनी यांनी ‘सपनों का सौदागर’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत अवघ्या अठराव्या वर्षी पदार्पण केले. त्यात राज कपूर त्यांचे हिरो होते. नंतर एकामागे एक यशस्वी चित्रपट देत त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. परंतु या सगळ्यामागे त्यांची आई जया या ठामपणे उभ्या होत्या. अगदी धर्मेंद्र यांच्याशी केलेल्या दुस-या विवाहाच्या वेळी सुद्धा त्या हेमा यांच्या पाठीशी उभ्या होत्या.

हेमा यांनी शेअर केलेला फोटो जुना असून त्यांच्या एका डान्सच्या वेळी काढल्याचं दिसून येत आहे. यात त्यांनी आईला घट्ट मिठी मारली आहे. हेमा या पोस्टमध्ये म्हणतात की, आज मदर्स डे आहे. एक असा दिवस ज्यावेळी आपण आपल्या आईच्या आठवणींना उजाळा देतो. तिचं प्रेम, तिचे कष्ट, मुलांचा सांभाळ करताना केलेली धावपळ या साऱ्यांच्या आठवणी पुन्हा एकदा जागवण्याचा दिवस. माझ्या आईसोबतचा माझा हा फोटो माझ्यासाठी फार मौल्यवान आहे, असं कॅप्शन हेमामालिनी यांनी दिलं आहे.

तसंच या फोटोसोबत त्यांनी त्यांच्या दोन्ही  कन्या अभिनेत्री इशा देओल आणि नृत्यांगना अहाना देओलसोबतही काही फोटो शेअर केले आहेत. हे सगळे फोटो जुने असून इशा आणि अहानाच्या बालपणीचे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.