Pimpri News: महापालिकेला आयुक्तांसोबत अतिरिक्त आयुक्तांचा बोनस, दोघांनी एकाच वेळी , एकाच दिवशी स्वीकारला पदभार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेला आयुक्तांसोबत अतिरिक्त आयुक्तांचाही बोनस मिळाला आहे. आयुक्त राजेश पाटील  यांच्यासोबत दोन महिन्यांपासून रिक्त असलेल्या अतिरिक्त आयुक्तपदी विकास ढाकणे यांची नियुक्ती झाली आहे.

आयुक्त, अतिरिक्त आयुक्त दोघांनीही एकाचेवळी आणि एकाचदिवशी पदभार स्वीकारला आहे. दरम्यान, स्थानिक अधिका-यांसाठी असलेले तिसरे अतिरिक्त आयुक्तपद कोणाला दिले जातात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आयुक्त राजेश पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

ओडिशा केडरचे 2005 च्या बॅचचे आयएएस राजेश पाटील  यांची आंतरराज्य प्रतिनियुक्तीने पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.  त्यांनी आज (सोमवारी) मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून पदभार स्वीकारला. तसेच महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी विकास ढाकणे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनीही आजच पदभार स्वीकारला.

तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांची पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त (सामान्य ) या पदावर 17 डिसेंबर 2020 रोजी बदली झाली. तेव्हापासून अतिरिक्त आयुक्तपद रिक्त होते. त्यांच्याजागी भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील (IRPFS)  विकास ढाकणे यांची नियुक्ती झाली आहे. ढाकणे उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांची 12 फेब्रुवारी रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाली आहे. राज्य सरकारचे उपसचिव कैलास बधान यांनी याबाबदचा आदेश काढला आहे.

तीसरे अतिरिक्त आयुक्तपद स्थानिक अधिका-याकडे देणार का?

राज्य सरकारने 1 सप्टेंबर 2014 रोजी पिंपरी महापालिकेचा समावेश ‘ब’ वर्गामध्ये केला आहे. ‘ब’ वर्गात समावेश झाल्यामुळे महापालिकेचा नवा आकृतीबंध, सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियम तयार केले होते.  महापालिकेच्या आकृतिबंधाला राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. नवीन आकृतीबंधानुसार महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत.

त्यातील दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तवरचे आणि महापालिका अधिका-यांकरिता पदोन्नतीसाठी एक याप्रमाणे तीन पदे निर्माण करण्यात आली आहेत. विकास ढाकणे  आणि अजित पवार हे दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तीवरील आहेत.  प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रविण तुपे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर स्थानिक अधिका-यांसाठी असलेले अतिरिक्त आयुक्तपद रिक्त आहे.

उपायुक्त आशादेवी दुरगुडे, चंद्रकांत इंदलकर, नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार देण्याचा प्रस्ताव प्रशासन विभागाने आयुक्तांकडे पाठविला होता. परंतु, तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नरोबाकुंजोराची भूमिका घेतली. आता नवीन आयुक्त राजेश पाटील तरी स्थानिक अधिका-याला न्याय देणार का, स्थानिक अधिका-याकडे अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार देणार का याकडे स्थानिक अधिका-यांचे लक्ष लागले आहे.
…….

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.