Pune : डॉ एस एन पठाण यांच्या ‘टाकीचे घाव ‘ आत्मचरित्राची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित

खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते प्रकाशन

एमपीसी न्यूज- नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि विश्व शांती केंद्र (आळंदी) चे राष्ट्रीय समन्वयक डॉ एस. एन. पठाण यांच्या
‘टाकीचे घाव ‘ या आत्मचरित्राच्या ‘चिजेल्स ब्लोज ‘ या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन इचलकरंजी येथे खासदार राजू शेट्टी आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते झाले.

‘डॉ एस एन पठाण यांचे जीवनच ‘धार्मिक सद्भावाची ज्योत ‘ असून ते हिंदू -मुस्लिम समाजाच्या एकात्मतेचे प्रतीक आहेत’ असे गौरवोद्गार राजू शेट्टी यांनी यावेळी काढले. खासदार राजू शेट्टी म्हणाले, ” रयत शिक्षण संस्थेच्या “कमवा आणि शिका’ योजनेतून शिक्षण घेत अधिव्याख्यातापदापासून, राज्याचे शिक्षण संचालक, नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदापर्यंतचा प्रवास करणाऱ्या पठाण सरानी या पुस्तकात आपल्यावर झालेले संस्कार, तसेच जीवनात मार्गदर्शक ठरलेल्या व्यक्तींबद्दल मोकळेपणाने लिहिले आहे. दारिद्र्यावर मात करून पठाण सर ज्या तडफेने आपली वाटचाल करतात, ती अनेक तरुणांना प्रेरणादायी ठरेल”.

यावेळी बोलताना डॉ एस एन पठाण म्हणाले, “भारतात हिंदू-मुस्लिम समाज एकोप्याने राहत आहे, तरीही अनेक राजकारणी हा एकोपा बिघडविण्याच्या प्रयत्नात आहेत. केवळ राजकारणासाठी चालणारे हे विखारी प्रयत्न यशस्वी होऊ देता कामा नयेत. ग्रामीण भागातील माझ्यासारखा एक गरीब मुस्लिम शिक्षणाच्या वाटेने जाऊन राज्याचा शिक्षण संचालक, कुलगुरू होतो, याचाच अर्थ या देशात प्रगतीच्या संधी सर्वाना समान उपलब्ध आहेत आणि या देशात जन्माला येणे हे भाग्याचे आहे हे सिद्ध करणाऱ्या आहेत”

या कार्यक्रमात डॉ. पठाण याना ‘स्वातंत्र्यसैनिक निजामुद्दीन काझी ‘ यांच्या नावाचा ‘सांप्रदायिक सद्भावना पुरस्कार’ राजू शेट्टी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पठाण जे एस पठाण उपस्थित होत्या. नुरुद्दीन काझी यांनी आभार मानले.

‘टाकीचे घाव ‘ही डॉ.पठाण यांची आत्मकथा आहे. प्रा. डॉ. मंजुषा धुमाळ (अमरावती) यांनी हे इंग्रजी भाषांतर केले आहे. इंग्रजी आवृत्ती ‘विश्वकर्मा पब्लिकेशन्स’ने प्रकाशित केली आहे. ‘टाकीचे घाव ‘ हे मूळ आत्मवृत्त २०१३ साली प्रकाशित झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.