Pune : पुस्तके माणूस आणि समाज घडवतात – डॉ. अश्विनी धोंगडे

एमपीसी न्यूज – पुस्तके माणूस आणि समाज घडवतात. व्यक्तीमत्व सुंदर चेहऱ्यावर अवलंबून नसते तर आचार, विचार आणि चांगल्या संस्कारातून घडते. जो ज्ञानवंत, बहूश्रूत , आत्मविश्वासू, विनयशील, चेहऱ्यावर बुद्धीचे तेज असते, त्याचे व्यक्तीमत्व सुंदर असते, असे सुप्रसिद्ध साहित्यिका डॉ. अश्विनी धोंगडे यांनी सांगितले. 

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान आयोजित विद्यार्थी विकास व्याख्यानमालेचे उदघाटन माजी खासदार अशोकराव मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पुणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांचा जही सत्कार करण्यात आला. पुस्तके घडवितात व्यक्तीमत्व, या विषयावर बोलताना डॉ. धोंगडे यांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.

डॉ. धोंगडे म्हणाल्या, मला मी नेहमीच श्रीमंत वाटते, कारण माझ्या घरात सहा हजार पुस्तके आहेत. चांगली पुस्तके नेहमीच चांगली, समाजाच्या उपयोगी येतील, अशी व्यक्तीमत्व घडवतात, तुम्ही देखील पुस्तकांशी मैत्री करा, मनापासून वाचन करा, वाचनाने आयुष्यातील प्रश्न आपण सहज सोडवू शकतो, समर्थ बनतो.

अशोकराव मोहोळ यांनीही संस्काराचे आणि पुस्तकांचे महत्त्व सांगितले. तर, आपल्या आयुष्यात चांगली माणसे आणि संस्कार मिळाले. त्यामुळेच समाजासाठी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाल्याचे दिलीप बराटे म्हणाले. प्राचार्य किरण सुर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. प्रतिष्ठानचे सचिव आणि व्याख्यानमालेचे समन्वयक वि.दा.पिंगळे यांनी व्याख्यानमाला घेण्यामागची भूमिका सांगितली व सूत्रसंचालन केले.

याप्रसंगी के.डी.पवार, कुणाल मोहोळ, दिवाकर पोफळे, देवेंद्र सुर्यवंशी, महादेव पवार उपस्थित होते. मामासाहेब मोहोळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय वारजे येथे कार्यक्रम संपन्न झाला. सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते मा.विनोद गोरे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.