Pune News : पुण्यात पहिल्या टप्प्यात 90 हजार नागरिकांना बुस्टर डोस

एमपीसी न्यूज : करोना संसर्गाची तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  पहिल्या टप्प्यात कोरोना प्रतिबंधासाठी काम करणार्या फ्रंटलाईन वर्क्सला ही लस दिली जात आहे. त्याचबरोबर 60 वर्षे वयापुढील ज्येष्ठ नागरिक यांना करोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस 10 जानेवारीपासून देण्याला सुरूवात होणार आहे. बुस्टर डोसच्या पहिल्या टप्प्यात 90 हजार नागरिक यासाठी पात्र असणार आहेत.

करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस ज्यांनी घेतले आहेत आणि दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले असतील त्यांनाच हा ‘बूस्टर’चा डोस मिळणार आहे. पुणे जिल्ह्यात या तिन्ही प्रकारचे मिळून एकूण 9 लाख लाभार्थी आहेत. त्यातील 90 हजार लाभार्थी जानेवारीत पात्र आहेत. पुणे शहर, ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड मिळून जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 57 हजार आरोग्य कर्मचारी यांनी पहिला तर 1 लाख 42 हजार जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

त्याप्रमाणेच फ्रंटलाईन वर्करमध्ये 2 लाख 52 हजार जणांनी पहिला आणि 2 लाख 33 हजार जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तर 60 वर्षे आणि त्यापुढील लाभार्थ्यांची संख्या सुमारे पाच लाख आहे. एकूण ही संख्या 9 लाख असून, त्यापैकी 90 हजार जणांना दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण होतात. म्हणजे हे 90 हजार लाभार्थी जानेवारी महिन्यात तिसरी लस घेऊ शकतात, अशी माहिती पुणे परिमंडळचे सहायक आरोग्य संचालक डॉ. संजय देशमुख यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.