Bopodi : बोपोडी चौकातील वाहतुकीस अडथळा ठरणार्‍या घरांवर हातोडा

एमपीसी न्यूज – बोपोडी चौकातील वाहतुकीस अडथळा ठरणारी घरे हटविण्यास पुणे महापालिकेने सुरुवात केली आहे. त्यामुळे हा चौक प्रशस्त होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील ग्रेडसेपरेटर रस्त्यावरून वेगात आलेली वाहने बोपोडी सिग्नल चौकात अडकून पडत होती. त्या कोंडीत सुमारे 1 ते 2 किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागत होत्या. दररोजच्या या वाहतूक कोंडीने वाहनचालक वैतागले आहेत. बोपोडी चौकातील पलंगे चाळीतील बैठ्या घराचा वाहतुकीस अडथळा होत होता. त्यासंदर्भात जागा मालकाने न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे पालिकेस कारवाई करता येत नव्हती.

तब्बल 10 वर्षानंतर सदर बांधकाम काढण्यास पुणे पालिकेस यश आले आहे. त्यामुळे तेथील धोकादायक बैठी घरे पाडण्यास महापालिकेने सुरूवात केली आहे. गेल्या 2 दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे. राडारोडा काढून तेथे रस्ता तयार केला जाणार आहे. त्यामुळे दापोडी हॅरीस पुलास समांतर झालेला कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींगच्या (सीएमई) बाजूच्या नव्या पुलावरून पुणे व खडकी बाजाराच्या दिशेने जाणार्‍या वाहनांना विनाअडथळा जात येणार आहे. वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.