Bopadi: जिन्यात उतरलेल्या विद्युत प्रवाहाचा शॉक लागल्याने चिमुरडी जखमी

एमपीसी न्यूज – घराशेजारी खेळत असताना लोखंडी जिन्यात उतरलेल्या विद्युत प्रवाहामुळे 7 वर्षीय मुलगी शॉक बसून गंभीर जखमी झाली. मुलीच्या मामाने तात्काळ लाकडाच्या सहाय्याने तिला बाजूला केल्याने तिचे प्राण वाचले. बोपोडीतील भीमज्योतनगर येथे शुक्रवारी (दि. 14) सकाळी ही घटना घडली.

वैभवी संतोष जाधव असे शॉक बसून जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. वैभवी शुक्रवारी सकाळी दहा वाजता घरासमोर खेळत होती. घरालगत असलेल्या महावितरण कंपनीच्या खांबावरील विद्युत प्रवाह त्यांच्या घराशेजारील लोखंडी जिन्यामध्ये उतरला. वैभवी खेळत असताना तिचा जिन्याला स्पर्श झाला आणि ती जिन्याला चिटकली गेली. आईने ते दृष्य पाहताच आरडाओरडा करुन तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिलाही वीजेचा धक्का बसला.

_MPC_DIR_MPU_II
  • मुलीचे मामा योगेश जाधव तेथे पळत आले. त्यांनी लाकडाच्या सहाय्याने वैभवीला बाजूला करीत तिचे प्राण वाचवले. बेशुद्धावस्थेतील वैभवीला तात्काळ खडकी कॅन्टोन्मेंट रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर तिला पुण्यातील एका खासगी रुग्णालयात हलविले.

दरम्यान, बोपोडीतील भिमज्योतनगर हा दाट लोकवस्तीचा परिसर आहे. महावितरण कंपनीच्या लोखंडी खांबावरील विद्युत प्रवाह घरात उतरण्याचा या भागातील मागील दोन महिन्यांतील हा दुसरा प्रकार आहे. यापूर्वी वैभवीच्या घराशेजारीच राहत असलेल्या एका घरात विद्युत प्रवाह उतरुन एक वर्षाची मुलगी जखमी झाली होती.

  • महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप शिवसेना महिला आघाडीच्या प्राजक्ता गायकवाड यांनी केला. सध्या अनेक भागात भुयारी विद्युत केबलद्वारे विद्युत प्रवाह जोडण्याचे काम केले जात आहे. भिमज्योतनगर भागातही भुयारी विद्युत प्रवाह केबल जोडणी करावी, अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.