BopKhel: आचारसंहितेपूर्वी मुळा नदीवरील पुलाच्या कामाला सुरूवात करा -नगरसेवक विकास डोळस

एमपीसी न्यूज – बोपखेल ते खडकीला जोडणा-या मुळा नदीवरील पुल बांधण्याचा आणि सार्वजनिक रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता पिंपरी-चिंचवड महापालिकेने तातडीने पुलाच्या खर्चाला स्थायीची मान्यता घ्यावी. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पुलाचे काम सुरू करावे, अशी मागणी नगरसेवक, स्थायी समिती सदस्य विकाड डोळस यांनी महापालिकेकडे केली आहे. या पुलामुळे बोपखेलवासियांचा वळसा मारण्याचा ताप संपणार असून बोपखेलवासियांचा महत्वाचा प्रश्न कायमचा सुटणार आहे, असेही ते म्हणाले.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नगरसेवक डोळस यांनी म्हटले आहे की, महापालिका हद्दीतील बोपखेलचे नागरिक दापोडीतील सीएमईच्या हद्दीतील रस्त्याचा रहदारीसाठी वापर करीत होते. मात्र, बोपखेल गावासाठी दापोडी येथून सीएमई हद्दीतून जाणारा रस्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 13 मे 2015 रोजी बंद करण्यात आला होता. चार वर्षांपासून बोपखेलवासियांना पिंपरी-चिंचवड किंवा पुण्यात जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेने मुळा नदीवर बोपखेल आणि खडकीला जोणारा पूल उभारण्याचा आणि रस्ता करण्याचा निर्णय घेतला.

  • त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात आवश्यक खर्चाची तरतूदही करण्यात आली. परंतु, नदीवरील पूल आणि रस्त्यासाठी लष्कराच्या मालकीची चार एकर जागा संपादन करावी लागणार आहे. लष्कराने आधी या जागेचा मोबदला मागितला. जागा मोजणीनंतर बाजारभावानुसार 25 कोटी 81 लाख रुपये देण्यास महापालिकेने तयारी दर्शविली. न्यायालयाने मुळा नदीवर बोपखेल आणि खडकीला जोणारा पूल उभारण्यास आणि सार्वजनिक रस्ता करण्यास परवानगी दिली.

त्यानंतर महापालिकेने मुळा नदीवर पूल उभारण्याच्या कामासाठी 45 कोटी 46 लाख 39 हजार 122 रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. या पुलामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला बोपखेलवासियांचा पुलाचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. त्यासाठी तातडीने पुलाच्या कामाला स्थायी समितीची मान्यता घेण्यात यावी. अनुषांगिक बाबी पुर्ण करुन लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापुर्वी कामाला सुरुवात करावी. काम उच्च दर्जाचे करावे, अशी मागणी नगरसेवक डोळस यांनी निवेदनातून केली आहे.

  • विकास डोळस म्हणाले, ”महापालिका हद्दीतील बोपखेलचे नागरिक दापोडीतील सीएमईच्या हद्दीतील रस्त्याचा रहदारीसाठी वापर करीत होते. मात्र, सीएमईने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्याने बोपखेलवासीयांना मोठा वळसा घालावा लागत होता. बोपखेल ते खडकीला जोडणा-या मुळा नदीवरील पुल बांधण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत होतो. जागेच्या मोबदल्यात संरक्षण विभागाला बाजारभावानुसार 25 कोटी 81 लाख रुपये देण्यास स्थायी समितीची मंजुरी देखील मिळवून घेतली होती”.

न्यायालयाने कामाला सुरुवात करण्यास परवनागी दिली आहे. त्यामुळे आता पुलाच्या कामाला स्थायी समितीची मान्यता घ्यावी. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागण्याची शक्यता आहे. त्याअगोदर पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात यावी. या पुलामुळे बोपखेलवासियांचा वळसा मारण्याचा ताप संपणार असून बोपखेलवासियांचा महत्वाचा प्रश्न कायमचा सुटणार आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.