Bopkhel: बोपखेल पुलाच्या कामाची निविदा प्रसिद्ध

महापालिकेच्या अर्थसंकल्पात आवश्यक खर्चाची केली तरतूद

एमपीसी न्यूज – बोपखेल ते खडकीला जोडणा-या मुळा नदीवरील पूल बांधण्याचा आणि सार्वजनिक रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने मुळा नदीवर पूल उभारण्याच्या कामासाठी सुमारे 45 कोटी 46 लाखांची निविदा आज (बुधवारी) प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे बोपखेलवासीयांना हक्काचा रस्ता उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

महापालिका हद्दीतील बोपखेलचे नागरिक दापोडीतील सीएमईच्या हद्दीतील रस्त्याचा रहदारीसाठी वापर करीत होते. मात्र, बोपखेल गावासाठी दापोडी येथून सीएमई हद्दीतून जाणारा रस्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 13 मे 2015 रोजी बंद करण्यात आला होता. चार वर्षांपासून बोपखेलवासियांना पिंपरी-चिंचवड किंवा पुण्यात जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेने मुळा नदीवर बोपखेल आणि खडकीला जोणारा पूल उभारण्याचा आणि रस्ता करण्याचा निर्णय घेतला.

त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात आवश्यक खर्चाची तरतूदही करण्यात आली. परंतु, नदीवरील पूल आणि रस्त्यासाठी लष्कराच्या मालकीची चार एकर जागा संपादन करावी लागणार आहे. लष्कराने आधी या जागेचा मोबदला मागितला. जागा मोजणीनंतर बाजारभावानुसार 25 कोटी 81 लाख रुपये देण्यास महापालिकेने तयारी दर्शविली.

  • 15 दिवसांत कामाला सुरुवात करण्याचे उच्च न्यायालयाचे दिले होते आदेश
    त्यानंतर लष्कराने जागेच्या मोबदल्यात जागेचीच मागणी केली होती. महापालिका, राज्य सरकार जागेच्या मोबदल्यात लष्कराला जागा देण्यास देखील तयार आहे. याच्या अधिन राहून न्यायालयाने मुळा नदीवर बोपखेल आणि खडकीला जोणारा पूल उभारण्यास आणि सार्वजनिक रस्ता करण्यास परवानगी दिली. त्याची निविदा प्रक्रिया करुन 15 दिवसात कामाला सुरुवात करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच दिले होते. त्यानंतर महापालिकेने मुळा नदीवर पूल उभारण्याच्या कामासाठी 45 कोटी 46 लाख 39 हजार 122 रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे बोपखेलवासियांसाठी पुल आणि सार्वजनिक रस्त्याच्या कामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.