BopKhel: महापालिकेच्या गलथान कारभारमुळे बोपखेलवासियांची पहाट पाण्यात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या गलथान कारभारामुळे बोपखेल येथील रामनगरवासियांची पहाट आज (शुक्रवारी) पाण्यात गेली. जलवाहिनी जोडल्यानंतर दुसरे टोक गोणीचा बोळा कोंबून बुजविण्यात आले होते. त्यामुळे पहाटे नागरिक झोपेत असताना पाणी थेट घरात शिरले. त्यामुळे बोपखेलवासियांची पहाट पाण्यात गेली.

बोपखेल येथील रामनगर भागात नवीन जलवाहिनी जोडण्याचे काम गुरुवारी (दि.14) करण्यात आले. नवीन जलवाहिनी जोडल्या नंतर वाहिनीचा शेवटचे तोंड बंद केले नव्हते. त्यामध्ये प्लास्टिक गोणीचा बोळा कोंबून तसेच बुजवण्यात आले होते. पहाटे पाचच्या सुमारास पाणी सोडल्यावर हे पाणी जमिनीतून थेट येथील अनेक घरांमध्ये शिरले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

  • पाणीपुरवठा विभागाच्या नवीन जलवाहिनीचे काम या भागात केले गेले होते. याच कामात केले गेलेले दुर्लक्ष आणि हलगर्जीपणा समोर आला आहे. महापालिका प्रशासनाने अशाप्रकारे केलेल्या अर्धवट कामामुळे नागरिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला. पाणीपुरवठा कर्मचा-यास माहिती मिळाल्यावर पाणीपुरवठा बंद करण्यात आला. मात्र, तोपर्यंत हजारो लिटर पाणी वाया गेले होते. आता या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. या सर्व घटनेमुळे महापालिकेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

याबाबत बोलताना कार्यकारी अभियंता रवींद्र पवार म्हणाले, ”बोपखेल भागात जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. जलवाहिनीवर नवीन एंड प्लेट बसविली आहे. ती प्लेट सटकली असावी. त्यामुळे हा प्रकार घडला. तातडीने पाणी पुरवठा बंद करण्यात आला. तसेच प्लेट बसविण्यात आली आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.