Bopkhel Crime News : आर्थिक देवाण-घेवाणीच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – आर्थिक देवाण-घेवाणीच्या कारणावरून तीन जणांनी केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात तब्बल 16 दिवसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

ही घटना 23 फेब्रुवारी रोजी लोहगाव विमानतळाजवळ आणि गणेशनगर, बोपखेल येथे घडली.

फईम इक्रामउद्दीन अन्सारी, असे मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. आसिफ (वय 25, रा. विमाननगर, पुणे), नाझिम (वय 23) आणि बुऱ्हाण (वय 25, पूर्ण नावे माहिती नाहीत. दोघेही रा. गणेशनगर, बोपखेल) अशी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सलीम इक्रामउद्दीन अन्सारी (वय 37, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी बुधवारी (दि. 10) याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत फईम याने आरोपी नाझीम याला 20 हजार रुपये उसने दिले होते. ते पैसे परत मागण्यासाठी फईम हा विमाननगर येथे नाझीम याचा भाऊ आसिफ याच्याकडे गेला होता. याचा राग मनात धरून आरोपींनी आपसांत संगनमत करून फईम याला लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली.

त्यानंतर हा वाद मिटविण्यासाठी गणेशनगर, बोपखेल येथे बोलावून पुन्हा मारहाण करण्यात आली. नाझीम याने फईम याच्या छातीत ठोसा मारला. त्यानंतर बेशुद्ध झालेल्या फईम याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. फईम याच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.