Bopkhel News:  पुलाचा मार्ग मोकळा, खासदार बारणे यांच्या पाठपुराव्यातून मिळाली ‘वर्किंग’ परवानगी

एमपीसी न्यूज  – बोपखेल ते खडकीला जोडणा-या मुळा नदीवरील उड्डाणपुलाच्या कामाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून अंतिम परवानगी मिळाली.

‘वर्किंग’ परवानगी मिळाल्याने आता महापालिकेने वेळ न घालविता पुलाचे काम तत्काळ हाती घ्यावे. काही  वर्षांपासून दळणवळनाचा त्रास सहन करत असलेल्या 40 हजार बोपखेलवासीयांना पूल वाहतुकीसाठी उपलब्ध करुन द्यावा, असे खासदार बारणे म्हणाले.

महापालिकेतर्फे बोपखेल ते खडकीला जोडणा-या मुळा नदीवर बोपखेलवासीयांसाठी बांधण्यात येणा-या पुलाचे 4 जानेवारी 2019 मध्ये काम सुरू झाले. नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले. परंतु, संरक्षण विभागाच्या जागेवरील काम बाकी होते. ते काम चालू करण्यासाठी संरक्षण विभागाची परवानगी आवश्यक होती. या परवानगीमुळे काम थांबले होते. कामाला विलंब होत असल्याने स्थानिक नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती.

खासदार बारणे यांचीही नागरिकांनी भेट घेतली होती. वर्किंग परवानगी मिळविण्यासाठी स्थानिक लोपकप्रतिनिधी म्हणून खासदार श्रीरंग बारणे यांनी सर्वाधिक प्रयत्न केले. वर्किंग परवानगी मिळावी यासाठी खासदार बारणे यांनी संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली. 24 सप्टेंबर 2020 रोजी संरक्षण विभागाच्या अधिका-यांशी पत्रव्यहार केला. सातत्याने त्यांच्याकडे पाठपुरावा केला.

बोपखेल या ग्रामीण भागातील नागरिकांना दळणवळणासाठी हा पूल एकमेव मार्ग असल्याचे अधिका-यांच्या निदर्शनास आणून दिले. या भागातील मुलांना शाळेत जाण्यासाठीही याच पुलाचा वापर करावा लागणार असल्याचे लक्षात आणून दिले. त्यामुळे लष्कराच्या हद्दीतील कामाला तत्काळ परवानगी देण्याची विनंती खासदार बारणे यांनी केली. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आणि 9 सप्टेंबर रोजी संरक्षण विभागाच्या जागेवरील काम करण्यासाठीची अंतिम वर्किंग परवानगी मिळाली.

त्यामुळे संरक्षण विभागाच्या जागेवरील पुलाचे काम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेने तत्काळ पुलाचे काम सुरु करावे असे आवाहन खासदार बारणे यांनी केले.

याबाबत बोलताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ‘’ बोपखेल पुलासाठी 2016 पासून मी सातत्याने पाठपुरावा करत होतो. तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, अरुण जेटली, निर्मला सीतारामण आणि विद्यमान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे पाठपुरावा केला. बोपखेल पुलाचे, खडकीला जोडणा-या  संरक्षण हद्दीतील रस्त्याचे काम सुरु करण्यासाठी ‘वर्किंग’ परवानगी बाकी होती.

पुलाला विलंब होत असल्याने स्थानिक नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या होत्या. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने प्रयत्न करुन पुलाच्या कामाला गती दिली. वर्किंग परवागी मिळण्यासाठी संरक्षण विभागाच्या दक्षिण कमांडचे महानिदेशक अमोल जगताप,  पुणे मंडलाच्या रक्षा संपदा अधिकारी राजेंद्र पवार यांना 24 सप्टेंबर 2020 रोजी मी पत्र पाठविले होते. त्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यानंतर वर्किंग परवानगी देण्याची प्रक्रिया सुरु झाली’’.

‘’संरक्षण विभागाची पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर वर्किंग परवानगी मिळाली. त्याबाबतचे संरक्षण विभागाचे पत्र मला मिळाले आहे. त्यामुळे आता संरक्षण विभागाच्या जागेतील पुलाचे काम सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे 40 हजार बोपखेलवासीयांचा दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे. महापालिकेने कोणताही विलंब न करता पुलाचे काम तत्काळ सुरु करावे. वर्षाच्या आतमध्ये काम पूर्ण करुन पूल बोपखेलवासीयांसाठी खुला करुन द्यावा’’, असेही खासदार बारणे म्हणाले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.