Bopkhel: बोपखेलच्या आरक्षित जागेवर विकसित होणार उद्यान

नगरसेवक विकास डोळस यांच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बोपखेल येथील आरक्षित जागेवर महापालिकेतर्फे उद्यान विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे तीन कोटी 13 लाख रुपये इतका खर्च येणार आहे. स्थानिक नगरसेवक विकास डोळस यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची बोपखेल येथे आरक्षित जागा आहे. त्याठिकाणी महापालिकेतर्फे उद्यान विकसित करण्यात येणार असून त्यासाठी महापालिकेच्या स्थापत्य विभागातर्फे निविदा मागविण्यात आल्या. मूळ तीन कोटी 34 लाख 3 हजार 253 रुपये किंमतीच्या या कामासाठी रॉयल्टी आणि मटेरीअल टेस्टिंग चार्जेस वगळून 3 कोटी 31 लाख 26 हजार 519 रुपयांवर निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार मेसर्स डी. डी. कन्स्ट्रक्शन, मेसर्स बी. व्ही. इंडिया लिमिटेड, मेसर्स बी. के. खोसे आणि मेसर्स यशक असोशिएट्स या चार ठेकेदार कंपन्यांनी निविदा सादर केल्या.

त्यामध्ये सर्वाधिक कमी अर्थात 6.1 टक्के कमी दराची निविदा डी. डी. कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीने सादर केली. त्यांनी हे काम 3 कोटी 11 लाख 5 हजार 801 रुपये अधिक 2 लाख 20 हजार 584 रुपये रॉयल्टी आणि 56 हजार 150 रुपये मटेरिअल टेस्टींग चार्जेस असे एकूण 3 कोटी 13 लाख 82 हजार 535 रुपयांमध्ये करून देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे बोपखेल येथील महापालिकेच्या आरक्षित जागेवर उद्यान विकसित करण्याचे काम मेसर्स डी. डी. कन्स्ट्रक्शन यांना देण्यात येणार आहे.

याबाबत बोलताना नगरसेवक विकास डोळस म्हणाले, ”बोपखेल-दिघी परिसरातील विविध आरक्षणे ताब्यात घेऊन विकसित करण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. आरक्षण विकसित केल्यास प्रभागातील नागरिकांना त्या सुविधेचा उपयोग होईल. आरक्षणाचा मुख्य उद्देश देखील साध्य होणार आहे. आरक्षणे ताब्यात घेऊन विकसित केली जाणार आहेत. उद्यानाचे आरक्षण ताब्यात घेण्यासाठी आम्ही चारही नगरसेवकांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर आरक्षण ताब्यात घेतले. त्यासाठी निधी मंजूर करुन घेतला. कामाला मंजुरी मिळाली असून प्रत्यक्षात कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. आरक्षण ताब्यात घेण्यासाठी नगरसेवक लक्ष्मण उंडे, निर्मला गायकवाड, हिराबाई घुले यांचे देखील सहकार्य मिळाले”, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.