BopKhel: बोपखेलमधील पूल आणि रस्ता या जागेच्या मोबदल्यात लष्कराला येरवड्यातील जागा द्या

लष्कराचे हवेलीच्या तहसीलदारांना पत्र

एमपीसी न्यूज – बोपखेलगावासाठी मुळा नदीवर पूल आणि रस्ता तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या चार एकर जागेच्या मोबदल्यात येरवडा येथील चार एकर जागा देण्यात यावी. या जागेचा सातबारा उतारा, आवश्यक नक्कल, मालमत्ता कार्डसह इतर सर्व कागदपत्रे देण्याचे पत्र लष्कराने हवेली तहसीलदारांना पाठविले आहे. त्यामुळे बोपखेलसाठी मुळा नदीवर पूल आणि कायमचा रस्ता तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बोपखेलवासीय वर्षानुवर्षे दापोडी येथील ‘सीएमई’च्या हद्दीतील रस्त्याचा रहदारीसाठी वापर करत होते. परंतु, सीएमईने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्याने बोपखेलवासीयांना सध्या पिंपरी-चिंचवड किंवा पुण्यात जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने मुळा नदीवर बोपखेल आणि खडकीला जोणारा पूल उभारून रस्ता करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात आवश्यक खर्चाची तरतूदही करण्यात आली. परंतु, पूल आणि रस्त्यासाठी पुन्हा लष्कराच्याच चार एकर जागेचे संपादन करावे लागणार होते.

  • लष्कराने जागेच्या मोबदल्यात जागेचीच मागणी केली. संबंधित अधिका-यांनी लष्कराला जागेच्या मोबदल्यात जागा देण्याची कार्यवाही सुरू केली. त्यानुसार लष्कराने येरवडा येथील सर्व्हे क्रमांक 202/2 मधील जागेला पसंती दिली आहे. या जागेचा सातबारा उतारा, आवश्यक नक्कल, मालमत्ता कार्डसह इतर सर्व कागदपत्रे देण्याबाबत मेजर अर्शदिप सिंग यांनी हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांना पत्र पाठविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.