Bopkhel : रस्त्यासाठी लष्कराला जागा देण्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना 

एमपीसी न्यूज – बोपखेल गावासाठी मुळा नदीवर पूल आणि रस्त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेला लष्कराची चार एकर जागा आवश्यक आहे. या जागेच्या बदल्यात जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून पुणे किंवा पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत लष्कराला जागा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.  कोणती जागा द्यायची याबाबत पंधरा दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना राज्याच्या महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना दिले आहेत.

बोपखलेच्या पुलासंदर्भात आज (शुक्रवारी)मुंबईत बैठक झाली. या बैठकीला मनुकुमार श्रीवास्तव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, महापालिका नगररचना विभागाचे उपसंचालक प्रकाश ठाकूर, पुणे महापालिका नगररचना विभागाचे सहायक संचालक, खडक कॅन्टोन्मेंट बोर्ड, नाशिकमधील देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड, अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोडार्चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि लष्कराचे अधिकारी उपस्थित होते.

महापालिका हद्दीतील बोपखेलचे नागरिक दापोडीतील सीएमईच्या हद्दीतील रस्त्याचा रहदारीसाठी वापर करीत होते. मात्र, सीएमईने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्याने बोपखेलवासीयांना मोठा वळसा घालावा लागत होता. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने मुळा नदीवर बोपखेल आणि खडकीला जोणारा पूल उभारण्याचा आणि रस्ता करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात आवश्यक खर्चाची तरतूदही केली.  लष्कराने अगोदर या  जागेचा मोबदला मागितला. जागा मोजणीनंतर बाजारभावानुसार 25 कोटी 81  लाख रुपये देण्यास महापालिका तयारी दर्शविली. त्यानंतर लष्कराने जागेच्या मोबदल्यात जागेचीच  मागणी केली आहे.

याबाबत बोलताना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”पिंपरी महापालिका हद्दीतील दिघी, मामुर्डी आणि पुणे महापालिका हद्दीतील वानवडी, औंध, वाघोली, भावडी या परिसरातील सरकारच्या अनेक जागा लष्कराला भाडे कराराने दिल्या आहेत. त्यापैकी एखादी जागा लष्कराला द्यावी, यावर चर्चा झाली. याविषयी जिल्हाधिका-यांना सूचना दिल्या आहेत”.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, ”लष्कराला कोणती जागा देता येईल याबाबतचा अहवाल 15 दिवसांत सादर करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांना दिले आहेत. त्यामुळे बोपखेल रस्त्याचा प्रश्न लवकर सुटणार आहे.  जिल्हाधिका-यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर तातडीने कार्यवाही करून रस्त्याचे काम सुरू केले जाईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.