BopKhel: पुलाच्या मार्गात अडथळा ठरणा-या विद्युत तारा हलविण्यासाठी 10 कोटी रूपये खर्चास मान्यता

एमपीसी न्यूज – बोपखेल येथील मुळा नदीवरील पुलाच्या मार्गातील अडथळा ठरणा-या महावितरण कंपनीच्या उच्चदाब व लघुदाब उपस्कर खांब आणि तारा हलविण्यात येणार आहे. या कामासाठी 10 कोटी रूपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

या कामाअंतर्गत विद्युत विषयक बाबींचे पुर्वगणपत्रक तयार करणे, निविदा बनविण्यासह कामाची देखरेख करणे, अशी निविदापूर्व आणि निविदापश्चात कामे करावी लागणार आहेत. या कामासाठी विद्युत विभागामार्फत प्रकल्प सल्लागारांकडून 20 फेब्रुवारी 2019 रोजी प्रसिद्ध केलेल्या नामिका सूचीनुसार दरपत्रक मागविण्यात आले. त्यानुसार, लिट्टम कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई यांच्याकडून 0.88 टक्के इतका लघुत्तम दर प्राप्त झाला आहे.

या कामासाठी तांत्रिकदृष्ट्या आराखडा तयार करून त्याप्रमाणे काम करून घेणे, प्रकल्पाच्या दैनंदीन कामावर देखरेख करणे, निविदा निर्देशानुसार गुणवत्ता तपासणी करणे आदी निविदा पूर्व आणि निविदापश्चात कामे चोखपणे होणे आवश्यक आहे.

त्यासाठी प्रकल्प सल्लागार नेमणे अत्यंत आवश्यक आहे. लिट्टम कन्सल्टंट यांनी यापूर्वी देखील अशा प्रकारची कामे केलेली आहेत. सध्या काही कामे प्रगतीपथावर आहेत. त्यांनी महापालिकेला आतापर्यंत वेळोवेळी आवश्यक मागणीनुसार, सेवा दिली आहे. त्यानुसार, हे काम तांत्रिक दृष्ट्या करून प्रत्यक्ष जागेवर नियोजित वेळेत काम होण्याच्या दृष्टीने लिट्टम कन्सल्टंट यांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांनी सादर केलेल्या 0.88 टक्के लघुत्तम दरानुसार त्यांना शुल्क देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.