Pune News : शिरूर गोळीबार प्रकरणी दोघांना अटक

उसन्या पैशाच्या वादातून केला होता खून

एमपीसी न्यूज : शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी गावात दोन दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून  स्वप्नील छगन रणसिंग (वय २४ रा.टाकळी हाजी ता.शिरूर) या तरुणाचा खून करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी पसार झाले होते. परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली आहे.

वाळू व्यवसायातून आणि उसन्या पैशाच्या वादातून हा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. विजय उर्फ कोयत्या गोविंद शेंडगे (वय 25) आणि आकाश उर्फ बबलु खंडु माशेरे (वय 24, दोघेही रा.आमदाबाद ता.शिरुर जि.पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 18 जानेवारी रोजी शिरूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास टाकळीहाजी गावात दिवसाढवळ्या गोळी झाडून स्वप्निल रणसिंग याचा खून करण्यात आला होता. शिरूर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारीही या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. दरम्यान या गोळीबार प्रकरणातील आरोपी चाकण शिक्रापूर चौकात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी वरील दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी खून केल्याची कबुली दिली. वाळू व्यवसायातून आणि उसण्या पैशाच्या कारणावरून त्यांनी हा खून केल्याचे सांगितले. आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना शिरूर पोलीस स्टेशन च्या ताब्यात सोपवण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.