Ghoravadi : घोरावडेश्वर डोंगरावर मोकाट वळूंचा उच्छाद

एमपीसी न्यूज – विविध सामाजिक आणि पर्यावरण प्रेमी संघटनांच्या प्रयत्नांमधून जुना पुणे मुंबई महामार्गावर असलेल्या घोरावडी डोंगराला हिरवाईचा शालू नेसविण्यात येत आहे. दिवसेंदिवस झाडांची संख्या वाढत आहे, त्यामुळे तिथे येणा-या नागरिकांची संख्या देखील वाढत आहे. दररोज सकाळी शेकडो नागरिक डोंगरावर व्यायामासाठी जातात. अशातच डोंगराच्या पठारावर 20 ते 25 वळुंनी चांगलाच उच्छाद मांडला आहे.

घोरावडेश्वर डोंगरावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केल्याने हा परिसर दिवसेंदिवस नैसर्गिक दृष्ट्या समृद्ध होत आहे. दररोज सकाळ पासून ते सायंकाळ पर्यंत शेकडो नागरिक डोंगराला भेट देतात. इथल्या झाडांसोबत तासंतास वेळ घालवतात. कधी डोंगराच्या पायथ्यावरुन पाणी आणून झाडांना दिले जाते. तर कधी झाडांची मशागत केली जाते. यामुळे डोंगरावर लावलेली झाडे वाढत आहेत. दररोज सकाळी आणि सायंकाळी शहर आणि परिसरातील नागरिकांची व्यायामासाठी इथे गर्दी असते. शनिवार आणि रविवारी तर सुट्टी असल्याने विशेष गर्दी असते. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत डोंगराच्या पठारावर येतात.

मागील काही दिवसांपासून डोंगरावर येणार मोकाट जनावरांची संख्या वाढत आहे. धारदार शिंगे, जाडजूड असलेले वळू पठारावर येतात. काही वेळेला त्यांच्यामध्ये झुंजही लागते. तर काही वेळेला हे वळू पठारावर व्यायामासाठी आलेल्या लहान मुले आणि वृद्धांच्या अंगावर धावून जातात. डोंगराच्या वरच्या पठारावर हा सगळा प्रकार होत असल्याने मुले आणि नागरिक डोंगराच्या पायथ्याच्या दिशेने धाव घेतात. डोंगराचा उतार अतिशय तीव्र आहे. त्यामुळे पळताना सर्वात मोठा धोका आहे. त्यामुळे मोकाट सुटलेल्या वाळुंचा संबंधित यंत्रणांनी तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

घोरावडेश्वर डोंगरावर नियमित व्यायामासाठी जाणारे दिलीप देसाई म्हणाले, “अलीकडच्या काही दिवसांमध्ये डोंगरावर मोकाट जनावरांचा वावर वाढत आहे. जनावरांचा वावर असल्याबाबत कोणतीही तक्रार नाही. पण ती जनावरे लहान मुले आणि वृद्ध नागरिकांच्या अंगावर धावून जातात. यामुळे काही अनुचित प्रकार घडण्याचा धोका आहे. डोंगरावर दररोज सुमारे 500 लोक येत असतात. डोंगरावर लावलेल्या झाडांचे देखील जनावरे नुकसान करीत आहेत. याची प्रशासनाने वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.