Pune News : ब्राह्मण महासंघाचा खडसेंच्या ‘त्या’ विधानावर आक्षेप !

एमपीसी न्यूज : मी भल्याभल्यांना दान देतो. मग एका ब्राह्मणाला दान द्यायला काय हरकत आहे. तेव्हा मी मुख्यमंत्रिपद ब्राह्मणाला दान केले, एका व्यक्तीच्या लाडापोटी माझ्यासारख्यांना बाजूला टाकण्यात आले, असे विधान राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केले होते. याच पार्श्वभूमीवर वादग्रस्त विधानावरून ब्राह्मण समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. पुण्यातील ब्राह्मण महासंघाने खडसेंच्या विधानावर आक्षेप घेत त्यांनी तातडीने माफी मागावी असं म्हटलं आहे.

एकनाथ खडसेंनी आपलं विधान मागे घ्यावं नाहीतर पुण्यात आल्यानंतर खडसेंना जाब विचारण्यात येईल, असे म्हणत आनंद दवेंनी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना निवेदन दिले आहे.

‘एकनाथ खडसेंनी फडणवीसांवर टीका करताना ब्राह्मण समाजाबाबत जे वक्तव्य केले ते त्यांनी मागे घ्यावं, अन्यथा पुण्यात खडसेंचा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही, त्यांच्या वक्तव्याचे परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे पदवीधर निवडणुकीत भोगावे लागतील’, असे म्हणत ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी गंभीर इशारा दिला आहे.
नेमकं काय म्हणाले होते खडसे…..
आम्हाला सांगितलं गेलं, नाथाभाऊ तू आता घरी बैस. मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. नाथाभाऊवर मुक्ताबाईचा आशीर्वाद आहे, त्यामुळे मी म्हटलं, घे रे, तू भी क्या याद करेगा. मी भल्या भल्यांना दान देतो तर ब्राह्मणांना दान द्यायला काय हरकत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.