Break the chain : ‘या’ सहा राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र सरकारने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत रेल्वे प्रवासासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि उत्तराखंड या सहा राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागणार आहे. ही सहा राज्ये कोरोना संवेदनशील जाहीर करण्यात आली असून, या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना 48 तासांपूर्वी RT- PCR चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

नव्या नियमानुसार प्रवाशांनी संपूर्ण प्रवासात मास्क घालणे बंधनकारक आहे. मास्क न घालणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड होऊ शकतो. प्रवाशांची रेल्वे स्टेशनवर प्रवास करताना थर्मल चाचणी करण्यात येईल. रेल्वेने महाराष्ट्रातल्या स्टेशन्सच्या प्रवेशद्वारांवर थर्मल स्कॅनर्स उपलब्ध करून देणं आवश्यक आहे.

गाडीत चढताना तसेच उतरताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे.

संवेदनशील ठिकाणांहून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची माहिती प्रवासी जाणाऱ्या जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तसंच ट्रेनची तपशीलवार माहितीदेखील प्राधिकरणाला देणं गरजेचं आहे. इच्छित स्थळी उतरल्यानंतर प्रवाशांच्या RT-PCR चाचणीचा अहवाल पाहून त्यांना सोडण्यात येईल.

प्रवाशांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्काही मारण्यात येईल. अशा प्रवाशांना पुढचे 15 दिवस वैद्यकीय इमर्जन्सीखेरीज घराबाहेर पडण्यावर बंदी असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.