Break the chain : किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 सुरु राहणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार

एमपीसी न्यूज – निर्बंध लागू असतानाही किराणा खरेदीच्या नावावर नागरिक दिवसभर बाहेर फिरत असल्याने या दुकानांची वेळ सकाळी 7 ते 11 पर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे.

रुग्णालयांमधील आरोग्य सुविधा,ऑक्सिजन पुरवठा, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणींचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख,अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे उपस्थित होते.

राज्यात कडक निर्बंध लागू केले असताना कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच किराणा दुकानांची वेळ सकाळी 7 ते 11 करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधक प्रभावी उपाययोजनांसाठी पालक सचिवांवर आता अधिक जबाबदारी राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. रुग्णालयांच्या ठिकाणीच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांच्या उभारणीवर भर दिला जाणार असून, ऑक्सिजन प्रकल्प निर्मिती व उभारणीसाठी खरेदीचे जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार राहतील. उद्योगातील बंद संयंत्रे सुरु करुन ऑक्सिजन निर्मिती वाढविणार तसेच, उद्योगांकडून अधिकाधिक ऑक्सिजन मिळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.