Wakad : वाहतुकीचे नियम मोडून वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – वाहतूकीचे नियम मोडणा-या वाहनचालकाला वाहतूक पोलिसांनी अडवले. त्याचा राग आल्याने वाहनचालक आणि त्याच्या साथीदाराने वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातली. तसेच पोलिसांना नोक-या घालवण्याची धमकी दिली. हा प्रकार डांगे चौक, वाकड येथे रविवारी (दि. 30) रात्री साडेदहाच्या सुमारास घडला. याप्रकरणी वाकड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
राहुल शशिकांत जगदाळे (वय 39, रा. थेरगाव), राहुल अर्जुन माने (वय 29, रा. बिजलीनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई महेश शंकर भोर यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पोलीस शिपाई भोर डांगे चौकात वाहतूक नियमन करत होते. डांगे चौकातून पुनावळेकडे जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. रात्री सव्वादहाच्या सुमारास जगदाळे त्या मार्गावरुन त्याची कार (एमएच 14 / डी एक्स 0759) घेऊन जात होता. भोर यांनी त्याला थांबण्याचा ईशारा केला. त्याचा जगदाळे याला राग आल्याने त्याने भोर यांना शिवीगाळ केली. तसेच ‘तुमच्या नोक-या घालवतो’ अशी धमकी दिली. जगदाळेच्या कारमध्ये बसलेला माने भोर यांच्या अंगावर धावून गेला. याबाबत गुन्हा नोंदवत दोघांना अटक करण्यात आली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like