Breathing Exercise : फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी श्वास रोखून धरण्याचा व्यायाम फायदेशीर

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे‌. त्यामुळे देशात ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. श्वास रोखून धरण्याचा व्यायाम रुग्णांची प्राणवायू गरज कमी करणारे आणि त्यांना स्वतःवर लक्ष ठेवण्यास प्रवृत्त करणारे तंत्र आहे. त्यामुळे फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी श्वास रोखून धरण्याचा व्यायाम करण्याचा सल्ला तज्ज्ञ डाॅक्टरांनी दिला आहे‌.

नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही.के पॉल व छाती शस्त्रक्रिया संस्थेचे अध्यक्ष, मेदांताचे संस्थापक आणि लंग केअर फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त, डॉ.अरविंद कुमार हे एका वेबिनारमध्ये बोलत होते. डॉ. अरविंद कुमार म्हणाले, ‘कोरोनाच्या 90% रुग्णांमध्ये फुफ्फुसांना काहीतरी झालेले असते पण ते क्लिनिकल दृष्टीने तितकेसे महत्त्वाचे नसते. 10% -12% व्यक्तींना न्यूमोनिया म्हणजे फुफ्फुसांचा संसर्ग होतो- यामध्ये फुफ्फुसांतील लहान लहान हवा पोकळ्यांना सूज येते. छोटे/अदीर्घ श्वास घेण्याची स्थिती जेव्हा आणखी तीव्र स्वरूप धारण करते तेव्हा, म्हणजे कोविड-19 रुग्णांपैकी अगदी कमी व्यक्तींना प्राणवायूच्या आधाराची गरज भासते.

डॉ. अरविंद म्हणाले, ‘सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना हा व्यायाम अतिशय फायदेशीर आहे. या रुग्णांनी त्याचा सराव केल्यास, त्यांना प्राणवायू पुरवठा करावा लागण्याची शक्यता कमी होते. रुग्णाच्या स्थितीवर देखरेख करण्यासाठीही या व्यायामाचा उपयोग होऊ शकतो. श्वास रोखून धरण्याचा वेळ जर कमीकमी होऊ लागला तर, ही एक वेळेवर मिळालेली धोक्याची पूर्वसूचना असून रुग्णाने डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज असल्याचे लक्षात घेतले पाहिजे. तर, एखाद्या रुग्णाला श्वास रोखून धरण्याची आपली क्षमता वाढवत नेता आली, तर ते आशादायक चित्र होय.

रुग्णालयात दाखल केलेले रुग्ण आणि प्राणवायू पुरवठा सुरु असलेले परंतु घरी पाठवलेले रुग्णही त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने याचा सराव करू शकतात. त्यामुळे त्यांची प्राणवायूची गरज कमी होण्यास मदत होऊ शकेल. सर्वसामान्य व्यक्तीही श्वास रोखून धरण्याचा व्यायाम करू शकतात. यामुळे फुफ्फुसे सुदृढ ठेवण्यास मदत होईल.

श्वास रोखण्याचा व्यायाम कसा करावा?

– सरळ ताठ बसा आणि तुमचे हात मांड्यांवर ठेवा.
– तोंड उघडून छाती भरेपर्यंत शक्य तितकी हवा तोंडावाटे आत घ्या
– ओठ घट्ट मिटून घ्या.
– तुम्हाला शक्य तेवढा वेळ श्वास रोखून धरा.
– किती सेकंद तुम्ही श्वास रोखून धरू शकता, ते पाहा.

रुग्णांनी हे दर तासाने करून बघावयास हरकत नाही. श्वास रोखण्याचा कालावधी रुग्णांना सरावाने वाढविता येईल. 25 सेकंद किंवा त्यापेक्षा अधिक काळ श्वास रोखून धरू शकणारे रुग्ण सुरक्षित आहेत- त्यांच्या आरोग्याला धोका नाही, असे समजले जाते. मात्र असे करताना ‘फार कठोरपणे प्रयत्न करून त्यानेच थकवा येणार नाही’ याची काळजी घेतली पाहिजे

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.