Pune News :- लग्नाची खरेदी करून जात असताना अपघात, नवरीचा मृत्यू, अवघ्या काही दिवसांनी होते लग्न

एमपीसी न्यूज : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर आज एक दुर्दैवी घटना घडली. लग्नाची खरेदी करून भावासोबत घरी परत जात असताना दौंड तालुक्यातील वरवंड येथे भीषण अपघात झाला. यामध्ये नवरीचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. प्रतिक्षा सदाशिव कांबळे (वय 21) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, दौंड तालुक्यातल्या मलठन येथील कांबळे कुटुंबातल्या प्रतीक्षा हिचे अवघ्या काही दिवसांनी लग्न होणार होते. सर्व तयारी झाली होती. बसताही बांधून झाला होता. दरम्यान प्रतीक्षा आज आपल्या भावासोबत पुणे येथे काही सामान खरेदी करण्यासाठी गेली होती. सामान खरेदी केल्यानंतर घरी परत येत असताना त्यांच्या दुचाकीला वरवंड याठिकाणी अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिली. यामध्ये दोघेही बहिण-भाऊ रस्त्यावर फेकले गेले. तर वाहनाचे चाक अंगावरून गेल्याने प्रतीक्षाचा जागीच मृत्यू झाला. तर तिचा भाऊ शुभम कांबळे हा किरकोळ जखमी झाला आहे.

अपघातानंतर भर रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात प्रतीक्षाचा मृतदेह पडला होता. तर बाजूलाच लग्नासाठी खरेदी केलेल्या कपड्यांची पिशवी पडली होती. बहिणीचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर भावाने केलेला आक्रोश बघ्यांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. दरम्यान अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळी न थांबता निघून गेला आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.