Pimpri News :  मनसेचे हिंदुत्व घराघरात पोहोचवा : रणजित शिरोळे

मनसेचा पक्ष बांधणी, सभासद नोंदणीवर जोर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मनसे पदाधिकारी तयारीला लागले आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका आणि पक्षप्रवेशावर जोर दिला जात आहे. अनेक कार्यकर्त्यांनी गेल्या दोन महिन्यात पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. मनसेचे हिंदुत्व घराघरात पोहोचविण्याच्या सूचना शहर प्रभारी रणजित शिरोळे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

आगामी महापालिका निवडणूक अवघी दहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र निवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पक्षबांधणीवर भर दिला आहे. सुरूवातीच्या काळात पिंपरी विधानसभा मतदार संघामध्ये पक्षाची बांधणी केली. त्यानंतर नवीन कार्यकर्त्यांचा प्रवेश घेण्यात आला.

चिंचवड मतदार संघात देखील पक्षाने जोरदार तयारी केली. अनेकांचे प्रवेश करून घेण्यात आले. भोसरी विधानसभा मतदार संघात देखील जुन्या विभाग आणि प्रभाग अध्यक्षकांनी इच्छुकांचे प्रवेश करवून घेतले. च-होली, मोशी, डुडूळगाव, भोसरी भागातील असंख्य युवकांनी मनसेला जवळ केले आहे. त्यामुळे तिन्ही मतदार संघामध्ये मनसेची ताकद वाढताना दिसत आहे.

पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी शहराध्यक्ष तथा पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गटनेते सचिन चिखले यांना पक्षवाढीसंदर्भात सूचना दिल्या आहेत. त्यानुसार त्यांनी स्थानिक कोअर कमिटीत सर्वानुमते निर्णय घेवून प्रत्येक पदाधिका-यांवर पक्षावाढीची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे सर्वच पदाधिकारी कामाला लागले आहेत. आपापल्या भागात पक्षाची ध्येयधोरणे प्रत्येकाच्या मनामध्ये रुजविण्याचे काम दिले आहे.

मनसेचे हिंदुत्व घराघरात पोहोचलं पाहिजे, याचा आढावा घेण्यासाठी  राज्याचे उपाध्यक्ष तथा पिंपरी-चिंचवडचे प्रभारी रंजित शिरोळे यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघात प्रभागनुसार कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या.  प्रभाग अध्यक्षांच्यासोबत बैठका घेऊन कामाचा आढावा घेतला. तसेच, त्यांना मनसेचे हिंदुत्व नागरिकांना पटवून देण्यासंदर्भात सूचना देखील केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.