Pune : सरकार कोणाचेही आणा, पण शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा – राजू शेट्टी

एमपीसी न्यूज – राज्यात राष्ट्रपती राजवटीमुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात सरकार कोणाचेही येवो, पण शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. राज्यात वेगळी आघाडी होत असेल, तर त्या चर्चेत आम्ही नाही. किमान समान कार्यक्रम काय असेल, हे पाहून आम्ही भूमिका ठरवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जम्मू – काश्मीरमधील शेतकऱ्यांशी शेट्टी यांनी संवाद साधला होता. त्या पार्श्वभूमीवर पुणे श्रमिक पत्रकार संघात त्यांच्या सोबत वार्तालापाचा आज कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.

अद्याप विरोधी पक्षांना जम्मू – काश्मीरमध्ये जाता आले नाही. देशभरातील सर्व शेतकरी नेत्यांनी राष्ट्रपतींच्या भेटीची वेळ शनिवारी मागितली होती. मी स्वतः राष्ट्रपतींचा सूचक होतो, त्यामुळे ते भेटीची वेळ देईल, अशी आशा होती, पण राष्ट्रपती निवडून आल्यावर कदाचित सूचकाला विसरले असावेत. उपराज्यपालांनीही भेटीची वेळ दिली नाही. 370 कलम रद्द झाल्यानंतर तेथील लोकांनी अघोषित कर्फ्यू स्वतः जाहीर केला आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोललो, त्यामध्ये हा निर्णय घेण्यापूर्वी आम्हाला विश्वासात का घेतले नाही, असा सूर दिसला, असेही शेट्टी यांनी सांगितले.

एकूण १० हजार कोटींपेक्षा जास्त उलाढाल सफरचंद व्यवसायात असते. पण, अद्याप काहीच व्यापार सुरू झालेला नाही. पर्यायी व्यवस्था नसेल, तर कसे होणार माहिती नाही. त्यांच्या डोळ्यांसमोर कदाचित शेतकऱ्यांकडे साडेतीन क्विंटल सोयाबीन, वांगी असतील, तर तो ऑनलाइन ट्रेडिंग कसे करेल ? असे सवालही शेट्टी यांनी उपस्थित केले.

घरात ढेकणे झाली म्हणून घर जाळणे योग्य नाही. बाजार समितीत दोष आहेत बाजार समित्यांसाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करा, पण समित्या बरखास्त करून, शहराच्या मध्यवर्ती भागांतील जागांवर कोणाचा डोळा आहे का? अशी शंकाही यावेळी उपस्थित करण्यात आली.

राज्यपालांच्या भूमिकेबाबत संभ्रम आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रपती राजवटीची घोषणा करण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक येणार होते. ते अजूनही आलेले नाही, असेही शेट्टी यांनी निक्षून सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.