Chinchwad : चिंचवडमध्ये आढळले ब्रिटिशकालीन निकामी बॉम्ब

एमपीसी न्यूज – चिंचवडगावात बॉम्ब सदृश वस्तू सापडल्याने परिसरात खळबळ उडाली. ही घटना शनिवारी (दि. 29) सकाळी उघडकीस आली. सोशल मीडियावर या वस्तू मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या. सापडलेल्या बॉम्ब सदृश वस्तू ब्रिटिशकालीन निकामी बॉम्ब असल्याचे चिंचवड पोलिसांनी सांगितले आहे.
पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडगावात वेताळ वस्ती येथे साफसफाईचे काम करणा-या एका महिलेला अडगळीत बॉम्बच्या आकाराच्या चार वस्तू दिसल्या. त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. चिंचवड पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने पाहणी करून या चारही वस्तू ब्रिटिशकालीन निकामी बॉम्ब असल्याचे उघड झाले.
ब्रिटिशकालीन निकामी बॉम्ब असून त्यापासून कोणताही धोका नसला तरी हे बॉम्ब लोकवस्तीमध्ये कसे आले. भंगारमध्ये कुणी त्याची विक्री केली आहे का, अशा विविध मार्गाने चिंचवड पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, हे ब्रिटिशकालीन निकामी बॉम्ब सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. माहिती मिळताच या परिसरात बॉम्ब बघण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली. चिंचवड पोलिसांनी चारही ब्रिटिशकालीन निकामी बॉम्ब ताब्यात घेतले आहेत. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.