Chakan News : घरात घुसून दोघांना मारहाण, मुलीचा विनयभंग; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून  दोघांना मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या मुलीशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

मोहित चंद्रकांत कोळेकर (वय 19, रा. कोळेकर वस्ती, करंजविहीरे, ता. खेड), विकी बबन येलसटे (वय 19, रा. माऊली नगर, झित्राईमळा, चाकण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह दोन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 36 वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 16 सप्टेंबर 2019 रोजी रात्री सात वाजताच्या सुमारास खेड तालुक्यात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपींचे 15 सप्टेंबर रोजी भांडण झाले होते. त्या भांडणाच्या कारणावरून 16 सप्टेंबर रोजी रात्री सात वाजताच्या सुमारास आरोपी फिर्यादी यांच्या घरात बेकायदेशीरपणे आले. आरोपी मोहित याने कोयत्याचा धाक दाखवत फिर्यादी यांच्या मुलीसोबत गैरवर्तन केले. त्यानंतर फिर्यादी यांची जाऊ आणि पतीला मारहाण केली. आरोपी मोहिते याच्या तीन साथीदारांनी  फिर्यादीच्या पतीला हाताने लाकडी काठी आणि पट्ट्याने मारहाण केली.

याबाबत आरोपींच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 452, 354, 324, 34, भारतीय हत्यार कायदा कलम 4 25, पोक्सो कायदा कलम 8, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी मोहित आणि विकी या दोघांना अटक केली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.