Pune : होर्डिंग पडल्यामुळे बहीण-भावाने आईनंतर पित्याचेही छत्र गमावले!

पाहा होर्डिंग पडतानाचा व्हिडिओ

एमपीसी न्यूज – आईचे अस्थीविसर्जन करून आळंदी येथून वडील आणि नातेवाईकांसोबत परत येत असताना समृद्धी आणि देवांश या दोघा भावांडावर काळाने आणखी एक घाला घातला. जुना बाजार येथे लोखंडी होर्डिंग परदेशी यांच्या रिक्षावर कोसळून या दूर्घटनेत त्यांच्या वडिलांचाही मृत्यू झाला. आईच्या मृत्यूच्या दुःखातून दोघे सावरलेही नसताना वडिलांचाही  मुत्यू झाल्याने समृद्धी आणि तिचा भाऊ पोरके झाले आहे. या घटनेने दोघांना मानसिक धक्काच बसला असून, नियतीच्या पुढे सारे हतबल झाले.

ही घटना आज शुक्रवारी (दि.5) दुपारी दोनच्या दरम्यान जुना बाजार येथील शाहीर अमर शेख चौकात घडली. शिवाजी देविदास परदेशी (वय 40), असे त्यांचे नाव आहे.

समृद्धी तिच्या कुटुंबीयांसोबत आळंदी येथून आपल्या आईच्या अस्थीविसर्जनावरून रिक्षामध्ये परतत असताना जुन्या बाजाराजवळ रिक्षावर अवजड लोखंडी होर्डिंग अचानक पडले आणि अनर्थ झाला. समृद्धीचे बाबा या घटनेत गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

या अकाली घटनेने समृद्धी आणि तिचा छोटा भाऊ यांना मोठा धक्काच बसला आहे. आईच्या निधनानंतर आधार असलेले बाबा देखील, असे अचानक गेल्यामुळे दोघा भावाबहिणींची मानसिक स्थिती शब्दांत न मांडण्यासारखी झाली आहे. या घटनेबद्दल सर्वच स्तरांतून हळहळ व्यक्त होत आहे. काल गुरुवारी समृद्धी आणि देवांशने आईला गमावले तर आज वडिलांना. घटनेमुळे या भावंडावर जणू होर्डिंग नाही तर आभाळच कोसळले.

जुना बाजार येथील शाहीर अमर शेख चौकातील मोठे लोखंडी होर्डिंग शुक्रवारी दुपारी कोसळले. यात तीन जणांचा मृत्यू झाला असून यात शिवाजी देविदास परदेशी (वय ४०) यांचा समावेश आहे. समृद्धी परदेशी (वय १८) ही शिवाजी परदेशी यांची मुलगी आहे. शिवाजी परदेशी हे रिक्षाचालक आहेत. समृद्धीची आई प्रीती यांचे गुरुवारी निधन झाले. प्रीती या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या.

https://www.youtube.com/watch?v=-pRD2S96gVY&feature=youtu.be

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.