Pimpri : बीआरटी मार्गात पीएमपीएमएल बस बंद; बीआरटी मार्गात बसच्या रांगा

प्रवाशांची रस्त्यावर गर्दी

एमपीसी न्यूज – पिंपरी येथे बीआरटी मार्गात बस बंद पडली. त्यामुळे बीआरटी वाहतुकीचा चांगलाच खोळंबा झाला. एक बस बंद पडल्याने बंद पडलेल्या बसच्या मागे सहा बस खोळंबल्या. ही घटना आज (सोमवारी) दुपारी साडेचारच्या सुमारास पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर घडली.
शेवाळेवाडी हडपसर ते निगडी-भक्तीशक्तीला जाणारी बस पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर अहिल्यादेवी होळकर चौकात ‘बीआरटी’ मार्गातच बसचे अचानक एअर लॉक झाल्याने बंद पडली. त्यामुळे एकामागोमाग एक अशी सहा बसची रांग लागली. बराच वेळ बस पुढे जात नसल्याने बसमधील प्रवाशांनी अन्य संसाधनांचा वावर करून गंतव्य स्थळी जाणे पसंत केले. सहा बसमधील प्रवासी एकदम खाली उतरल्याने अहिल्याबाई होळकर चौकात एकच गर्दी झाली.

पीएमपीएमएलच्या निगडी आगारातून टोइंग व्हॅन बोलाविण्यात आले. सव्वापाचच्या सुमारास टोइंग व्हॅनच्या साहाय्याने बंद पडलेल्या बसला नेण्यात आले. त्यानंतर बंद पडलेल्या बसच्या मागे खोळंबलेल्या रिकाम्या बस निगडीच्या दिशेने धावल्या. तांत्रिक बिघाडामुळे अचानक एअर लॉक झाल्याचे सांगण्यात आले. मागील आठवड्यात महापालिका प्रशासनाने दापोडी ते निगडी या मार्गावरील बहुप्रतिक्षित बीआरटी सेवा सुरू केली. मात्र लहान सहान बाबींच्या नियोजनामुळे असा खोळंबा झाल्याचे दिसून आले.
यापूर्वी अनेकदा अशा घटना घडल्या असून त्यावर अनेकदा चर्चा करण्यात आल्या आहेत. मात्र बीआरटी मार्गात अशा बसेस बंद पडल्यावर उपाय काय या प्रश्नाचे उत्तर अद्याप सापडलेले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.