Bhosari : बीआरटी चालक, वाहकाने प्रवासी तरुणीचे पाकीट केले परत

एमपीसी न्यूज – बीआरटी बसमधून प्रवास करत असताना एका प्रवासी तरुणीचे पैशांचे पाकीट बसमध्ये पडले. वाहक आणि चालकाने प्रामाणिकपणे ते पाकीट वरिष्ठांकडे जमा केले. वरिष्ठांनी संबंधित तरुणीशी संपर्क करून तिचे पाकीट तिला परत केले. पाकीट हरवल्याने निराश झालेल्या तरुणीला तिचे पाकीट पैशांसह मिळाल्याने तिचा आनंद गगनात मावेना.

संतोष नामदेव सस्ते वाहक आणि त्रिभुवन नेहरे चालक म्हणून पीएमपीएमएलमध्ये नोकरी करतात. ते 27 ऑगस्ट रोजी सकाळी 8.20 ची बस भोसरी-मनपा ही बस(एम एच 12 / आर एन 6059) घेऊन गेले. मनपा येथे पोहोचल्यानंतर सर्व प्रवासी उतरले. त्यावेळी संतोष आणि त्रिभुवन यांना बसमध्ये महिलांचे एक पाकीट सापडले. त्यांनी ते पाकीट वाहतूक नियंत्रक काळुराम लांडगे आणि विजय आसादे यांच्याकडे दिले.

लांडगे आणि आसादे यांनी पाकीट उघडून बघितले असता त्यामध्ये महा ई सेवा केंद्राची पावती मिळाली. लांडगे यांनी त्याआधारे राजगुरूनगरला तहसीलदार कार्यालयाजवळ असलेल्या एका महा ई सेवा केंद्रात जाऊन चौकशी केली. केंद्रातील लिपिक यूसुफभाई शेख यांनी त्या पावती वरून संबंधित तरुणीचा संपर्क क्रमांक दिला. त्यावर संपर्क साधून लांडगे आणि आसादे यांनी वैभवी नंदकुमार पडवळ (रा. खराबवाडी ता.खेड जि.पुणे) यांच्याशी संपर्क साधला. वैभवी यांना त्याचे पाकीट त्यातील तीन हजार रुपये आणि महत्वाची कागदपत्रे सुखरूपपणे पोहोचवली. वैभवी यांनी चालक, वाहक आणि पीएमपीएमएल प्रशासनाचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.