BSNL News : महागाई भत्ता गोठवला; बीएसएनएल कर्मचाऱ्यांची निदर्शने

एमपीसीन्यूज : कोरोना संकट काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या बीएसएनएल कर्मचाऱ्यांना सरकारने कोणतीही सवलत नाही. तसेच  केंद्र सरकारने सार्वजनिक उद्योगातील कर्मचारी व निवृत्त कर्मचारी यांचा महागाई भत्ता 30 जुन 2021 पर्यंत गोठवण्याचा निर्णय घेतला. याच्या निषेध करण्यासाठी NFTE, SEWA आणि SNATTA या संघटनांच्या नेतृत्वाखाली आज, मंगळवारी सातारा रोडवरील बीएसएनएलच्या संचार भवनसमोर बीएसएनएल कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. तसेच येत्या 26 तारखेचा देशव्यापी संप पुणे विभागात 100 टक्के यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

यावेळी झालेल्या द्वारसभेत कॉ. सोपान शिंदे, कॉ. बी. डी. बाळसराफ, कॉ. आनंद मुडवीकर यांनी केंद्र सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला. याप्रसंगी NFTE संघटनेचा 67 वा वर्धापन दिनही साजरा करण्यात आला. यावेळी कर्मचारी आणि कामगार संघटनांचे पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

एकाच मंत्रालयाच्या अखत्यारीत असूनही पोस्टल कर्मचाऱ्यांना लागू केलेला 10 लाखाचा विमा बीएसएनएल कर्मचाऱ्यांना दिलेला नाही. मान्यताप्राप्त हॉस्पिटलमध्ये मिळणारी कॅशलेस सेवा बंद झाली आहे. कामावर असताना अनेक कर्मचारी कोविड बाधित झाले असताना त्यांना विशेष रजा सुध्दा नाकारण्यात आली. काम करूनही मासिक पगार वेळेवर होत नाही. मेडिकलची बिले प्रलंबित आहेत.

बोनस, एलटीसी आधीच बंद केली असून 2017 पासून प्रलंबित असलेला वेतन कराराचे पालन केले जात नाही,. 80 हजार कर्मचारी VRS घेऊन गेल्यामुळे मनुष्यबळ कमी झाले आहे. आऊटसोर्सिंगचे मॉडेल फसले आहे. बीएसएनएलला 4 G देण्याचे आश्वासन सरकारने पाळले नाही.

उलट आत्मनिर्भरतेच्या नावाखाली आडकाठी निर्माण करुन बीएसएनएलला आर्थिक मदत सुध्दा दिलेली नाही. सर्व बाजूंनी कोंडी झाल्याने हा कर्मचारी अत्यंत त्रस्त असून मानसिक तणावाखाली काम करत आहे. अशातच महागाई भत्ता गोठवून सरकारने जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप शिंदे आणि मुडवीकर यांनी केला.

बीएसएनएलच्या कर्मचाऱ्याचे पगार व भत्ते बीएसएनएलच्या उत्पन्नातून दिले जातात. सरकार यासाठी एक पैसाही मदत करत नाही. त्यामळे हा भत्ता गोठवणे म्हणजे निव्वळ अत्याचार आहे. त्या ऐवजी वाढत्या महागाईला आळा घालून सरकारने आपली कार्यक्षमता दाखवायला हवी.

मात्र, मुठभर उद्योगपतींच्या हितासाठी चालवण्यात येत असलेल्या या सरकारने कामगार कर्मचाऱ्यांचे शोषण करण्याचे धोरण अवलंबले असल्याचा घणाघाती आरोप शिंदे आणि मुडवीकर यांनी केला.

कॉ. उल्हास जवळकर यांनी सूत्रसंचलन केले. कॉ प्रदीप गायकवाड यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.