Union Budget 2021 LIVE Updates : आज लोकसभेत सादर होणार बजेट

एमपीसी न्यूज : भारताचा २०२१-२०२२ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प (बजेट) आज लोकसभेत सादर होईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करतील. कोरोना संकटामुळे भारतासमोर अनेक आर्थिक आव्हाने उभी ठाकली आहेत. या परिस्थितीतून मार्ग काढण्याचे काम अर्थसंकल्पातून करण्याचा प्रयत्न होणार आहे. 

देशाच्या ग्रामीण भागाचा विकास करणे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे आणि नागरिकांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतुदींची शक्यता आहे. आरोग्य सेवा तसेच वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन यासाठी केंद्र सरकार अर्थसंकल्पातून ठोस धोरण जाहीर करण्याची शक्यता आहे.

महागाई नियंत्रणात ठेवत नागरिकांना खर्चासाठी जास्त पैसा उपलब्ध करुन देण्याचे कठीण आव्हान अर्थमंत्र्यांना पेलायचे आहे. बाजारात जास्तीत जास्त पैसा खेळता राहावा यासाठीही त्यांना प्रयत्न करायचे आहेत. या बिकट परिस्थितीतून अर्थमंत्री कसा तोडगा काढणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.

दरवर्षी अर्थसंकल्प तयार झाल्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांतील सर्व सदस्यांसाठी अर्थसंकल्पाच्या छापील प्रती तयार केल्या जातात. या प्रक्रियेसाठी जवळपास १०० कर्मचाऱ्यांचे पथक सलग १५ दिवस काम करते. अर्थसंकल्पातील तरतुदींची गोपनीयता जपण्यासाठी छापील प्रती तयार करणारे कर्मचारी त्यांचे काम सुरू असतानाच्या काळात कडेकोट बंदोबस्तात एका मोठ्या सभागृहात मुक्काम करतात.

त्यांना बाहेरच्या जगाशी संपर्क साधण्यास बंदी असते. यंदा कोरोना संकटामुळे हे काम करण्यास कर्मचारी अनुत्सुक असल्याचे कर्मचारी संघटनेने केंद्र सरकारला आधीच कळवले होते. या नंतर परिस्थितीचे भान राखून केंद्र सरकारने आर्थिक सर्वेक्षण (इकॉनॉमिक सर्व्हे) आणि अर्थसंकल्प (बजेट) या दोन्हीच्या छापील प्रतींऐवजी सॉफ्ट कॉपी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांतील सर्व सदस्यांना (खासदार) आर्थिक सर्वेक्षण (इकॉनॉमिक सर्व्हे) आणि अर्थसंकल्प (बजेट) या दोन्हीच्या सॉफ्ट कॉपी दिल्या जातील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.