Chakan : म्हैस शेतात गेल्यावरून दोन गटात हाणामारी; परस्पर विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – म्हैस शेतात गेल्यावरून तिला हाकलून लावताना दोन गटात वाद झाला. सुरुवातीला म्हैस चारण्यासाठी आणलेल्या मुलाला मारहाण झाली. त्यानंतर, गावात गेल्यानंतर मुलाने त्याचा भाऊ व आईला घेऊन दुस-या गटासोबत भांडण केले. ही घटना गुरुवारी (दि. 5) सकाळी साडेनऊ व सायंकाळी साडेसातच्या सुमारास खेड तालुक्यातील शिवे पिंपळगाव येथे घडली.

गणेश जयराम खेंगले (रा. वावळेवाडी शिवे, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, साहेबराव मनोहर शिवेकर, अनुसया मनोहर शिवकर (दोघे रा. वावळेवाडी शिवे, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास गणेश त्यांची म्हैस घेऊन शेतात चारण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपींनी म्हैस इथे चारू नको, असे सांगितले. त्यावर ‘मी म्हस हाकलून घेऊन जातो’ असे गणेशने सांगितले. तरीही आरोपीने म्हशीला दगड मारला. यावरून गणेश आणि आरोपी यांच्यामध्ये वाद झाला. आरोपींनी गणेशला मारहाण केली. यामध्ये गणेशच्या डोळ्याला, पायाला व हाताला इजा झाली.

याच्या परस्पर विरोधात साहेबराव मनोहर शिवेकर (वय 48, रा. वावळेवाडी शिवे, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गणेश जयराम खेंगले, दिनेश जयराम खेंगले, कांता जयराम खेंगले (सर्व रा. वावळेवाडी शिवे, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साहेबराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सकाळी गणेश म्हैस घेऊन साहेबराव यांच्या शेतात आला. शेतातील भाजीपाल्यात म्हैस आल्याने साहेबराव यांच्या आईने इथे म्हैस चारू नको म्हणत, लहान दगडाने म्हशीला हाकलले. यावरून वाद झाला. त्यानंतर गणेश आणि साहेबराव आपापल्या कामाला गेले. सायंकाळी गणेश त्यांच्या भाऊ आणि आईला घेऊन आला. त्यांनी साहेबराव यांना लाकडी दांडक्याने व बॅटने मारहाण केली. शिवीगाळ करत ‘परत आमच्या नादाला लागाल तर मारून टाकीन’ अशी धमकी दिली. दोन्ही गुन्ह्यांचा तपास चाकण पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.